कोल्हापूर : अजून सरकारी नोकरीत असल्याने भाष्य करणार नसलो तरी अन्य पर्यायांबरोबरच राजकारणात प्रवेश करण्याचा पर्यायही मी खुला ठेवला आहे. फेब्रुवारीनंतरच याविषयी भूमिका जाहीर करू, असे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी स्पष्ट केले.‘ब्रॅँड कोल्हापूर’ उपक्रमाच्या उद्घाटनासाठी रविवारी येथे आलेल्या मुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मुळे यांच्या उमेदवारीवरून मध्यंतरी बऱ्याच चर्चा झडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी राजकारण प्रवेशाचे संकेत दिले.मुळे हे फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. ते शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील रहिवासी आहेत. परराष्ट्र मंत्रालयातील नोकरीनिमित्त त्यांनी आतापर्यंत २५ हून अधिक देशांत सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या संकल्पाविषयी विचारले असताना मुळे म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर सामाजिक चळवळीत अधिक सक्रिय होण्याचा माझा मानस आहे; पण त्याचबरोबरीने राजकारणात प्रवेश करण्याविषयीही माझी ना नाही. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील कामाचा अनुभव असणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. तसा अनुभव असणाºया लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची गरज आहे.निवृत्तीनंतर अवयवदानासाठी राष्ट्रीय पातळीवरचे काम हाती घेण्याचा मानस आहे. याशिवाय देशभर पसरलेला मराठी आणि जगभर पसरलेला भारतीय माणूस यांना जवळ आणण्यासाठीच्या उपक्रमांना आपले प्राधान्य राहणार असल्याचे मुळे यांनी सांगितले. कुरुक्षेत्र, कर्नाल, तंजावर, इंदूर या ठिकाणी मराठी माणूस विखुरला आहे. त्याला महाराष्ट्राशी जोडण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेणार आहे. याशिवाय जगभरात असलेल्या ३० कोटी भारतीयांना एकत्र आणून त्यांना देशाच्या विकासप्रक्रियेत सहभागी करून घेण्याविषयीचीही मोहीम हाती घेण्याचा मानस आहे.लोकसभा मतदारसंघात एक पासपोर्ट केंद्रपासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केल्यानंतर आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक पासपोर्ट केंद्र काढण्याचे सरकारचे धोरण आहे. आतापर्यंत २२६ कार्यालये कार्यरत झाली असून ९३ प्रस्तावित आहेत. अजून १५० कार्यालये लवकरच सुरू होत आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
राजकारण प्रवेशाचा पर्याय खुला:ज्ञानेश्वर मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:48 PM