कोल्हापूर : निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवकांना राज्य सरकारने कायद्यात बदल केल्याने जीवदान मिळाले असून, यासंबंधीचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या सहीचे राजपत्र प्राप्त झाल्यामुळे सर्व नगरसेवकांना महापालिकेच्या नियमित कामकाजात भाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला.
कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अडचणीत आले होते; त्यामुळे या सर्वांनी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन तांत्रिक चुकीचा फटका नगरसेवकांना बसू नये, अशी विनंती केली होती. मंत्री पाटील यांनीही सकारात्मक दृष्टीने हा विषय हाताळून कायद्यात भूतलक्षीप्रभावाने बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेतला; परंतु यासंबंधीचे अधिकृत वटहुकूम अथवा राजपत्र मिळाले नसल्यामुळे १८ नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजापासून दूर राहावे लागले होते.
कायद्यात बदल केल्याचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या सहीचा अध्यादेश २७ सप्टेंबर २०१८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला. त्याची अधिकृत माहिती सोमवारी महापालिका प्रशासनास प्राप्त झाली. नगरसचिव दिवाकर कारंडे, निवडणूक अधिकारी विजय वणकुद्रे यांनी हा अध्यादेश वाचून पाहिला. त्यानंतर त्यांनी १८ नगरसेवकांना आजपासून नियमित कामकाजात भाग घेता येईल, असे स्पष्ट केले.तीन वर्षे गेली न्यायालयीन लढाईतमहानगरपालिकेवर निवडून आलेल्या २० नगरसेवकांची तब्बल तीन वर्षे केवळ न्यायालयीन लढाई लढण्यात गेली. आधी जातीचे दाखले वैध की अवैध यावर न्यायालयात फेºया झाल्या. त्यातून मोकळे होतात न होतात तोच सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्रे निवडणूक आयोगास सादर न केल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई झाली. एका नगरसेवकास मात्र घरी जावे लागले, तर एक नगरसेविकेची लढाई अद्याप सुरुच आहे. तीन वर्षे आणि लाखो रुपये नगरसेवक पद टिकविण्यात गेल्यानंतर आता कुठे सर्व संकटे दूर झाल्याने नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला.मार्ग मोकळा झालेले नगरसेवक -* कॉँग्रेस - स्वाती यवलुजे, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, दीपा मगदूम, वृषाली कदम, रिना कांबळे
* राष्टवादी कॉँग्रेस - हसिना फरास, सचिन पाटील, अफजल पीरजादे, शमा मुल्ला
* ताराराणी आघाडी - किरण शिराळे, सविता घोरपडे, कमलाकर भोपळे
* भारतीय जनता पक्ष - मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, विजयसिंह खाडे, संतोष गायकवाड
* शिवसेना - नियाज खान