कोल्हापूर : येथील केआयटी महाविद्यालयात वाहन हायब्रीड तंत्रज्ञानासाठी सेंटर आॅफ एक्सलन्सची स्थापना होणार आहे. यासाठी केआयटी आणि लंडनमधील कॅलसॉनिक कन्सायसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे.
वाहन तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी कॅलसॉनिक कन्सायचे लंडनस्थित युरोप विभागाचे उपाध्यक्ष व संशोधन व विकास विभागाचे प्रमुख ताकाशी ओटा व कॅलसॉनिक कन्सायच्या अंतर्गत गुणवत्ता विकास विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक कल्पक पाटणकर यांनी केआयटी महाविद्यालयास भेट दिली.भारतातील भेटीसाठी आय.आय.टी. मद्रासनंतर त्यांनी कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली. केआयटीचे व्यवस्थापन आणि प्राध्यापकांशी चर्चेअंती केआयटी संस्थेमध्ये सेंटर आॅफ एक्सलन्स स्थापन करण्याचे कॅलसॉनिक कन्सायने तत्त्वत: मान्य केले. केआयटीसह सामंजस्य करारासाठी मान्यता दिली.
याबाबतच्या इतर तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी कंपनीचे पदाधिकारी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा भेट देणार आहेत. या सेंटर आॅफ एक्सलन्समुळे केआयटी आणि कोल्हापुरातील तरुण संशोधकांना वाहनांच्या हायब्रीड तंत्रज्ञानामध्ये संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.येत्या काळात या क्षेत्रात अभियंत्यांची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्या अनुषंगाने या भेटीदरम्यान संशोधन क्षेत्राची व्याप्ती वाढविणे, नवीन सहकारी शोधणे व नवसंशोधकातून नवीन कल्पना गतिमान करणे, यासाठी अंतर्गत प्रशिक्षण या सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये असणार आहेत. या कार्यक्रमास केआयटीचे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, विश्वस्त डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, रजिस्ट्रार एम. एम. मुजुमदार, एस. एम. पिसे, सुभाष माने उपस्थित होते.चारचाकीची निर्मिती क्षमता वाढेलजागतिक संशोधन क्षेत्रामध्ये भारतामधील संस्था आणि मनुष्यबळ सहभागी करणे, संयुक्त संशोधनासाठी भागीदार शोधण्याच्या अनुषंगाने ‘केआयटी’ची भेट घेतली आहे. आगामी दिवसात हायब्रीड टेक्नॉलॉजीवर आधारित चारचाकीची निर्मिती क्षमता वाढेल, असे ताकाशी ओटा यांनी यावेळी सांगितले.कोल्हापुरात कॅलसॉनिक कन्साय या कंपनीचे लंडनस्थित युरोप विभागाचे उपाध्यक्ष व संशोधन व विकास विभागाचे प्रमुख ताकाशी ओटा यांचे स्वागत केआयटीचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी केले. यावेळी शेजारी कल्पक पाटणकर, साजिद हुदली, डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, एस. एम. पिसे, सुभाष माने उपस्थित होते.