लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीतून सहा नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. गेल्या अनेक निवडणुकीत सत्तारुढ गटाची पॅनेलची रचना करताना फारतर एक दोन जागाच बदलल्या जात असत; परंतु यंदा किमान निम्मे पॅनेल तरी बदलले आहे. या आघाडीतून भाजपच्या चार उमेदवारांना संधी मिळाली आहे.
या आघाडीतून १२ विद्यमान संचालक पुन्हा नशिब आजमावत आहेत. धनाजीराव देसाई हे माजी संचालक आहेत. मागील दोन निवडणुकीत ते कुठेच चित्रात नव्हते. त्यांच्याकडे काही ठराव असल्याने व ठरावधारकांना परिचित चेहरा या निकषांवर त्यांना संधी मिळाली. गडहिंग्लजमधून प्रकाश चव्हाण यांना भाजप व मराठा कार्ड मदतीला धावून आले. दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे जावई ही ओळख व महाडिक निष्ठा प्रताप पाटील कावणेकर यांना उमेदवारी देऊन गेली. राजू भाटळे हे मूळचे राष्ट्रवादीचे. त्यांची पत्नी जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आहेत; परंतु शौमिका महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना भाटळे यांचे महाडिक कुटुंबांशी जवळचे संबंध निर्माण झाले. आमदार पी.एन.पाटील यांचा या जागेवर विजयसिंह मोरे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह होता; परंतु अमल महाडिक यांनी शेवटपर्यंत आग्रह धरल्याने राजू भाटळे यांना उमेदवारी मिळाली. रविश पाटील कौलवकर यांना पी.एन.पाटील यांनी संधी दिली. त्यांचे वडील उदयसिंह पाटील हे भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. धनाजी देसाई, विलास कांबळे यांना सत्तारुढ आघाडीसोबत येण्यात कौलवकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचा राजे गट म्हणून कागलमधून एका जागेचा आग्रह होता. त्यांना सत्तारुढमधून उमेदवारी मिळाली नसली तरी सध्या जिल्ह्याच्या राजकारणात भाजप म्हणून सक्रिय असलेले रणजित पाटील, प्रकाश चव्हाण, दीपक भरमू पाटील व शौमिका महाडिक यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे बाबा देसाई सध्या तज्ज्ञ संचालक होते. त्यांनीही अर्ज भरला होता; परंतु त्यांना संधी मिळाली नाही.
महाडिक यांचा प्रभाव..
सत्तारुढ आघाडीचे नेते म्हणून सर्वांनीच आमदार पी.एन.पाटील यांचा एकमुखी उल्लेख केला असला तरी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यात महाडिक यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त दिसते.
कोरोना कट्ट्यावर
दोन्ही आघाड्यांची घोषणा होताना कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोना
बसला
कट्ट्यावर अशीच कांहीशी स्थिती होती.