कोल्हापूर : महापुरामुळे जे विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेच्या तिसऱ्या सत्रातील मुख्य परीक्षेला बसू शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. ही परीक्षा कोणत्या तारखेला होईल याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून विद्यार्थ्यांना माहिती कळविली जाईल. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाबाबत ट्विटरद्वारे केंद्रीय आणि राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी दिली.
जेईई मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी दि. २५ आणि २७ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. एनटीएच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संबंधित केंद्रावर येऊन परीक्षा देणे आवश्यक असते; पण गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील अन्य पूरबाधित जिल्ह्यांमधील अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष केंद्रावर येणे शक्य होणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही परीक्षेबाबत संभ्रमावस्था होती.
याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, पालकांनी माझ्याशी संपर्क करून यामध्ये मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, तसेच एनटीएच्या अधिकाऱ्यांना ट्विटरद्वारे विद्यार्थ्यांची ही अडचण कळविली. विद्यार्थ्यांच्या अडचणींबद्दल सकारात्मक निर्णय झाला असून, जे विद्यार्थी तिसऱ्या सत्रातील परीक्षेला बसू शकणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
चौकट
‘एनटीए’कडून विद्यार्थ्यांना माहिती
‘एनटीए’कडून याबाबत विद्यार्थ्यांना माहिती कळविली जाईल. ही माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे आमदार पाटील यांनी आभार मानले.