दत्तवाड : इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या विरोधात दूधगंगा बचाव कृती समिती मार्फत आज दत्तवाड ता. शिरोळ येथे राज्य सरकारच्या आदेशाची होळी करून निषेध करण्यात आला. यापुढे योजना रद्द केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीकडून यावेळी देण्यात आला.इचलकरंजी शहराला सुळकुड येथील दूधगंगा नदीतून पाणी देण्यास शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, दानवाड टाकळीवाडी या गावातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. यापूर्वीही अनेक वेळा नागरिकांनी याला विरोध दर्शवला होता. तरीदेखील शासनाने या योजनेला मंजुरी दिली आहे.मागील उन्हाळ्यात तीन वेळा दूधगंगा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे दतवाड सह परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी वणवण भटकावे लागले होते. त्यामुळे दत्तवाड येथील नागरिकांनी गांधी चौक येथे या योजनेला मंजूर दिलेल्या आदेशाची आज होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला. ही योजना रद्द करावी अशी एकमुखी मागणी केली योजना रद्द झाली नाही तर यापुढेही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, गुरुदत्त शुगरचे बबनराव चौगुले, देवराज पाटील, विवेक चौगुले, राजगोंडा पाटील, राजू पाटील, सुरेश पाटील, प्रमोद पाटील, प्रकाश चौगुले, लाला मांजरेकर, सोमनाथ माने, बाळासो कोकणे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इचलकरंजीला दूधगंगेचे पाणी देण्यास विरोध, दूधगंगा बचाव कृती समितीने राज्य सरकारच्या आदेशाची केली होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 4:30 PM