आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0९ : गेल्या २५ वर्षांपासूनचे कोल्हापूर आणि कोकणवासीयांचे स्वप्न असणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाचे उदघाटन रविवारी (दि. ११) कोल्हापुरात होणार आहे. त्यादृष्टीने श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे तयारीची लगबग सुरू आहे. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ‘कोल्हापूर-वैभववाडी’ मार्गाच्या कामाचे उदघाटन केले जाणार आहे. "]
या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सुमारे १३७५ कोटी रुपयांची तरतूद गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी केली होती. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण जानेवारी २०१६ मध्ये पूर्ण झाले असून या मार्गाला अर्थसंकल्पात मान्यता मिळाली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या मार्गाच्या कामासाठी २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्याच्या कामासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने सरकारला सादर केला. यानंतर दि. २५ मार्च रोजी कोल्हापुरात मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध कामांचे उदघाटन झाले. यात ‘कोल्हापूर-वैभववाडी’ च्या कामाचे उदघाटन अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे ते झाले नाही.
आता रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे रविवारी (दि. ११) उदघाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पुणे-लोंढा मार्गाच्या विद्युतीकरणाबाबतचा सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मध्य रेल्वेकडून कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे स्वच्छता, डागडुजीचे काम, आदी स्वरुपात तयारीची लगबग सुरू आहे.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने ‘कोल्हापूर-वैभववाडी’ मार्गाचे उदघाटन रविवारी करण्याचे तात्पुरते नियोजन केले आहे. निश्चित वेळ, प्रमुख उपस्थिती आदींबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. प्राथमिक स्वरुपातील तयारी देखील सुरू आहे.
रेल्वेमार्गाचा प्रकल्प दृष्टिक्षेपात
कोल्हापूर-वैभववाडी हा सुमारे १०७ किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग
यासाठी एकूण ३२४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित
पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १३७५ कोटी रुपयांची तरतूद