इको-सेन्सिटिव्ह झोनला तब्बल २८ गावांचा विरोधकृती समितीची स्थापना : राधानगरीतील सर्वपक्षीय बैठकीत निर्णयराधानगरी : पश्चिम घाटात प्रस्तावित असणाऱ्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये राधानगरी तालुक्यातील २८ गावांचा समावेश करण्याबाबतच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत. यामुळे या गावांना भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय मंगळवारी राधानगरीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. अभयारण्यामुळे अनेक गावांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात ही भर पडल्यास तालुक्याच्या पश्चिम भागाला विकासापासून वंचित राहावे लागणार आहे. धरणांमुळे विस्थापित झालेल्या गावांचा येथील बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे याविरोधात लोक एकवटले आहेत. पहिल्या टप्प्यात २ मे रोजी तहसील व वन्यजीव विभागावर मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत तालुक्यातील राधानगरीसह २८ गावांचा समावेश आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण होणार असले तरी यातील कडक नियमांमुळे मानवी वावरावर अनेक निर्बंध येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रस्तावित इको-सेन्सिटिव्हमधून ही गावे वगळावीत यासाठी वेगवेगळ्या आंदोलनाचे टप्पे कृती समितीतर्फे ठरविण्यात आले आहेत. राधानगरी येथील अंबाबाई मंदिरात इको-सेन्सिटिव्ह झोनच्या विरोधात मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. विस्तारित अभयारण्यामुळे यापूर्वीच यातील अनेक गावांना वेगवेगळे निर्बंध लागू झाले आहेत. गेल्या एक-दोन वर्षांत वनविभागाकडून याबाबत काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे या गावांमध्ये नवीन घरे बांधणे, दुरुस्ती करणे, शासकीय निधीतून होणारी विकासकामे, शेतीमधील सुधारणा यामध्ये अडथळे आले आहेतच, याशिवाय वन्यजीव विभागाने ग्रामपंचायती व महसूल विभागाला येथील मालमत्ता हस्तांतर, खरेदी-विक्री, वारसा नोंदी करू नयेत, अशा सूचना दिल्याने असे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे लोकांच्या अडचणीत भर पडली आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे. तसेच अभयारण्यात समाविष्ट असलेल्या काही गावांसह अभयारण्याच्या सीमेलगतच्या दहा किलोमीटर परिसरातील गावांमध्ये इको-सेन्सिटिव्ह झोन लागू करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये राधानगरी या तालुक्याच्या ठिकाणासह २८ गावांचा समावेश आहे. याच्या मंजुरीनंतर या गावांनाही वरीलप्रमाणे अडचणी निर्माण होणार असल्याने याविरोधात नागरिक उभे ठाकले आहेत.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, पंचायत समिती सभापती दिलीप कांबळे, सदस्य मोहन पाटील, माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजेंद्र भाटळे, संभाजी आरडे, तानाजीराव चौगले, मनसे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रा. पी. एस. पाटील, रमेश पाटील- बचाटे, सुहास निंबाळकर, सुनील बडदारे, बाळासो पाटील (फराळे), गोविंदराव चौगले, शामराव चौगले, मंगेश सावंत, सुभाष पाटील, बशीर राऊत, डॉ. सुभाष इंगवले, अॅड. संभाजीराव पाटील, बायसन नेचर क्लबचे राकेश केरकर, अशोक पारकर यांच्यासह २८ गावांतील सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इको-सेन्सिटिव्ह झोनला तब्बल २८ गावांचा विरोध
By admin | Published: April 19, 2017 1:00 AM