कोल्हापूर : शहरातील नागरिकांना पुरेशा सुविधा देता येत नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने घरफाळा वाढ करा म्हणून प्रस्ताव आणला आहे? असा सवाल करीत सत्ताधारी व विरोधकांनी प्रशासनाच्या घरफाळा वाढीच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. घरफाळ्यासंबंधी प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेत असल्याचा निषेध करीत मंगळवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. भाजप, ताराराणी आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात विरोधाचे फलक फडकावले; तर सर्वच सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.
लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता शहरातील सर्व प्रकारच्या मिळकतींवर दहा ते तीस टक्के घरफाळा वाढीचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेपुढे ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेनेच्या राहुल चव्हाण, नियाज खान व प्रतिज्ञा उत्तुरे यांनी घोषणाबाजी करीतच सभागृहात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या हातात घरफाळा वाढीला विरोध करणारे फलक होते.
ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम यांनी या विषयाला हात घातला. घरफाळा वाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर केल्यापासून या क्षणापर्यंत नगरसेवकांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही. सत्ताधारी झेंडे व विरोधाच्या घोषणा देत सभागृहात येत आहेत. माकडाच्या हाती प्रशासन का कोलीत देतंय? असा सवाल करीत कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, घरफाळ्याचा प्रस्ताव देताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. प्रशासन चुका करते आणि त्याचे खापर मात्र आमच्या डोक्यावर फोडले जाते. आधी आमचे सर्वांचे राजीनामे घ्यावेत आणि मग प्रशासनाने कामकाज चालवावे. २०१२ मध्ये आमची दिशाभूल करून घरफाळा आकारणीचे सूत्र बदलले. त्यामुळे आमचा घरफाळा वाढीला तीव्र विरोध आहे.
कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनीही प्रशासनाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. सर्वसामान्यांवर कोणत्याही परिस्थितीत घरफाळा वाढ होऊ देणार नाही. याउलट ज्या मिळकतधारकांनी आपल्या मिळकती भाड्याने दिल्या आहेत, त्यांचा घरफाळा कमी झाला पाहिजे. वार्षिक भाड्याच्या ७६ टक्के घरफाळा आकारला जातो, तो कमीत कमी २५ टक्क्यांपर्यंत खाली आला पाहिजे, अशी भुमिका त्यांनी स्पष्ट केली .अपघातातील मृत व्यक्तींना श्रद्धांजलीशिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत मिनी बस कोसळून २६ जानेवारी रोजी झालेल्या अपघातातील १३ मृत व्यक्तींना तसेच सोमवारी (दि. १९) पहाटे शिवज्योत घेऊ न जाणाºया वालचंद महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांच्या वाहनाला नागाव फाटा येथे अपघात होऊन त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सहा विद्यार्थ्यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.सभागृहात बॅनर्स, फलक, घोषणाबाजी घरफाळ्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले. सर्वांनीच प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध केला. घरफाळा वाढीला विरोध करणारे फलक, बॅनर्स सभागृहात आणले होते. सर्वच नगरसेवकांनी जागेवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. याच प्रश्नावरून सभागृह तहकूब करीत असल्याची घोषणा महापौर स्वाती यवलुजे यांनी केली.पंडितांच्या समाधीवरून वादराजर्षी शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळानजीक राजगुरू रघुपती पंडित उर्फ पंडित महाराज यांची समाधी बांधण्याबाबत अजित ठाणेकर, किरण शिराळे यांनी दिलेल्या सदस्य ठरावावरून सभेत शारंगधर देशमुख व विजय सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वाद झाला. दोघांमध्ये बराच वेळ हा वाद सुरू राहिला. आम्ही इतिहासाबाबत अज्ञानी आहोत; त्यामुळे छत्रपती घराण्याशी चर्चा करून याबाबतचा ठराव करावा, अशी सूचना देशमुख यांनी केली; तर सदस्य ठराव असल्याने त्यास मंजुरी द्यावी, विरोध करू नये, अशी भूमिका सूर्यवंशी यांनी घेतली. विषय बराच वेळ ताणल्यावर अखेर हा ठराव नामंजूर करावा लागेल, असा इशारा देशमुख यांनी देताच सूर्यवंशी यांनी माघार घेतली. हा ठराव पुढील सभेत घेण्याचे ठरले.एक आठवड्यात पर्याय द्याघरफाळा वाढीला कडाडून विरोध करतानाच भाड्याने दिलेल्या मिळकतींचा घरफाळा कमी करण्याकरिता प्रशासनाने आठ दिवसांत पर्याय द्यावा, अशी सूचना सभागृहाने केली. प्रशासनाने प्रस्ताव द्यावा म्हणून मंगळवारची सभा तहकूब ठेवण्यात आली.