लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या गायरानमधील भूखंड ताब्यात घेताना ग्रामस्थांनी सदाशिव शंकर पाटील यांना विरोध केला. बोगस कागदपत्रे तयार करून हा भूखंड तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने शंकर पाटील यांच्या नावावर केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी व तहसीलदारांना याबाबत तक्रारीचा निवेदन देण्यात आले आहे .
हणमंतवाडी येथील गायरान गट नंबर २३५ अ मधील दहा एकर क्षेत्रांपैकी पाच एकर क्षेत्र पूररेषेत येणाऱ्या ग्रामस्थांना वाटप करण्यात आले होते. यात १९८९ मध्ये गावातील पूर बाधित २५ ग्रामस्थांना भूखंडाचे वाटप झाल्यानंतर पुन्हा नव्याने भूखंड वाटप झालेले नसताना सदाशिव शंकर पाटील या क्षेत्रात आपला भूखंड असल्याचे कागदपत्रे सादर करून तो ताब्यात घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी पोलीस संरक्षणात महसूल विभागाचे कर्मचारी आणले होते.
पण ग्रामस्थांनी याला विरोध करत महसूल व पोलिसांना अटकाव केला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. ज्या बोगस ठरावाद्वारे हा भूखंड ताब्यात घेण्यात आला होता. तोच १५ ऑगस्ट २०१५च्या गावसभेत बहुमताने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे पूररेषेत असल्याने सदाशिव पाटील यांचे वडील शंकर पाटील यांना १९८९ मध्ये याच गट नं.२३५अ मध्ये २५ पूररेषेत येणाऱ्या ग्रामस्थांबरोबर भूखंड देण्यात आला आहे. यानंतर नवीन नकाशा व प्लॅनप्रमाणे २६ नंबरचा भूखंड नसताना मोजणी कशी करताय असा जाब विचारायला सुरुवात केली. यात नूतन सरपंच संग्राम भापकर उपसरपंच तानाजी नरके सर्व सदस्य व ग्रामस्थ असल्याने पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांना नरमाईने घ्यावे लागली. करवीर प्रांतांनी चौकशीसाठी सदाशिव पाटील यांना बोलावले आहे.
प्रतिक्रिया
संग्राम भापकर (सरपंच), सदाशिव पाटील यांनी बनावट लेआउट करून हा भूखंड मंजूर करून घेतला आहे. याला चतु:सीमा नाही. गटनं. २३५-अ मध्ये २६ नंबरचा प्लॉटच नाही. यापूर्वी पूररेषेत येत असल्याने यांना भूखंड देण्यात आला आहे. ही संपूर्ण जागा गावच्या क्रीडांगणासाठी आरक्षित केली असल्याने सदाशिव पाटील यांच्या विरोधात प्रांत तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे
फोटो
हणमंतवाडी, ता. करवीर येथे सदाशिव पाटील यांना गायरानमधील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेत महसूल कर्मचारी पोलीस संरक्षणात भूखंड देताना ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विरोध केला यावेळी सरपंच संग्राम भापकर व ग्रामस्थ उपस्थित होते.