कागल : दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यास कागल तालुक्यासह नदीकाठच्या सर्वच गावांचा विरोध कायम आहे. हुपरी येथे आमदार प्रकाश आवाडे यांनी याबद्दल सर्वसमावेशक बैठक घेऊन यातून सामंजस्याने मार्ग काढ, असे जाहीर केले आहे. असे असले तरी आमच्या हक्काचे पाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत घेऊ देणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत, असे प्रतिपादन दूधगंगा नदी बचाव कृती समितीचे समन्वयक धनराज घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या प्रसिद्धी पत्रकावर माजी पंचायत समिती सदस्य अनिल गुरव, राजाराम मोरे, सचिन घोरपडे, लिंगनूर दुमाला उपसरपंच सीमा तोडकर, कांचन बंडा माने, वैभव आडके आदींच्या सह्या आहेत.
पंचगंगा नदीवरून दूधगंगेचे पाणी नेण्याचा प्रकार म्हणजे एक दुर्मीळ उदाहरण ठरेल. आमदार प्रकाश आवाडे हे माजी मंत्री असून अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. भाजपाचे सहयोगी सदस्य आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी पंचगंगा नदीचे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प राबवून यावर तोडगा काढायला हवा. आज तंत्रज्ञान किती तरी पुढे गेले आहे. पंचगंगेसारखी नदी प्रदूषित राहणे हे जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. म्हणून दूधगंगेचे पाणी नेण्याचा पर्याय बंद करून, आहे त्या नदीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यावर विचार करावा, असे पत्रकात म्हटले आहे.