कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. अजूनही सविस्तर दौरा निश्चित नसला, तरी ते येणार हे निश्चित असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
प्राथमिक नियोजनानुसार बुधवारी सातारा, गुरुवारी सांगली आणि शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यांचा ते दौरा करतील, असे सांगण्यात आले. या तीनही जिल्ह्यात महापूर आणि दरडी कोसळ्याच्या दुर्घटना घडल्या. यातील प्रमुख ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह ते भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
समन्यव अधिकारी नेमण्याचा निर्णय
आता केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांचे दौरे सुरू होणार असल्याने त्यांना माहिती देण्यासाठी एक समन्वय अधिकारी नेमणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात सांगितले. ते म्हणाले, आता आमचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे पूर्णपणे पुनर्वसन आणि अन्य कामात झोकून देतील. कोणा मान्यवरांचे दौरे असतील, तर त्यांना माहिती देण्यासाठी एका समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांवरील टीकेनंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.