कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅँकेच्या कर्मचाºयांची सर्व प्रकारची देणी तातडीने द्या; अन्यथा आपल्या दारात ठिय्या आंदोलन सुरू करू, असा इशारा खासदार आनंदराव आडसूळ यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राज्य सरकारने भूविकास बॅँकेच्या कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत १९ नोव्हेंबर २०१७ ला मंत्रिमंडळ उपसमितीची नेमणूक केली. त्यांनी मालमत्ता विक्रीबाबत व कर्मचाºयांची देणी अदा करण्याबाबत चर्चा केली. मालमत्ता विक्री करताना ई-टेंडरला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाºयांची देणी लवकर अदा करण्यासाठी मालमत्ता शासनास हस्तांतरित कराव्यात.
मालमत्तांचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून, सदर मालमत्तांची किंमत २७ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार, शासनाला भूविकास बॅँकेकडून येणे असलेली १८९७.२४ कोटी रक्कम समायोजित न करता ही रक्कम कर्मचाºयांची देणी अदा करण्यासाठी शासनाने शिखर भूविकास बॅँकेस उपलब्ध करून द्यावी, असा निर्णय झाला होता. बॅँकेचे शेतकºयांकडे थकीत असलेले कर्ज माफ करण्यासाठी शासनाच्या कर्जमाफी योजनेतून विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्णय झाले होते. हा निर्णय होऊन एक वर्ष झाले, तरीही याबाबत काहीही ठोस निर्णय घेतलेले नाहीत.
कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत सर्व विभागांची उच्चस्तरीय बैठक किंवा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक तातडीने घ्यावी. चालू अधिवेशनात याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी आपल्या दारात बेमुदत आंदोलन सुरू करतील आणि उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आनंदराव आडसूळ यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे.