लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीबाबत आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून येथील निर्णयानंतरच पॅनेल बांधणीला अंतिम स्वरूप देण्याची व्यूहरचना दोन्ही आघाड्यांची आहे. त्यामुळे जर न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले, तर विरोधी आघाडी आज सायंकाळी, तर सत्तारूढ आघाड्यांकडून उद्या, मंगळवारी सकाळी अकरा वाजताच पॅनलची घोषणा होणार आहे.
माघारीचा अखेरचा दिवस जसा जवळ येईल, तसे पॅनल बांधणीस गती आली आहे. रविवारी दोन्ही आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरूच होते. सत्तारूढ गटाकडून आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांच्यात बैठक झाली. यामध्ये ‘गोकुळ बचाव’ मंचकडील नाराज इच्छुकांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत चर्चा झाली. न्यायालयाने निवडणूक घेण्यास स्थगिती दिली तर आताच नावे निश्चित करून नाराजी वाढेल आणि निवडणूक घेण्याचे आदेश दिले तर आज, सोमवारी रात्री बसून पॅनल निश्चित करू व उद्या, मंगळवारी सकाळी नावाची घोषणा करण्याचे ठरले आहे.
विरोधी आघाडीचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींची बैठक कसबा बावड्यात झाली. यामध्ये पॅनलमधील नावांवर खलबते होऊन संबंधितांना सिग्नल दिले आहेत. न्यायालयाच्या सुनावणीनंतर आज, सायंकाळी पॅनलची घोषणा केली जाणार आहे.
नरके यांच्याकडून ‘एस. आर.’ना संधी
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कळंबा येथील कार्यालयात झाली. येथे करवीरमधील उमेदवारी निवडीचे अधिकार नरके यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक इच्छुकाशी व्यक्तिगत चर्चा केली. विधानसभा निवडणुकीचे गणित पाहता जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. आर. पाटील (प्रयाग चिखली) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
माणसं सांभाळा, माघारीसाठी प्रयत्न करा
विरोधी आघाडीच्या बैठकीत नेत्यांना आपली माणसं सांभाळून त्यांची समजूत काढून माघारीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना करण्यात आल्या.
‘शेकाप’मध्ये उमेदवारीवरून गुंता
‘शेकाप’मध्ये उमेदवारीवरून काहीसा गुंता तयार झाला आहे. पक्षाकडून दोन नावांवर खलबते सुरू आहेत, तर विरोधी आघाडीकडून एकाच नावाचा आग्रह धरल्याचे समजते.
विरोधी आघाडीचे संभाव्य पॅनेल
सर्वसाधारण गट - विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगुले, एस. आर. पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, नविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, सतीश पाटील, रणजितसिंह कृ. पाटील, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, किसन चौगुले, दिलीप पाटील, विक्रमसिंह चव्हाण, बाबासाहेब देवकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
इतर मागासवर्गीय - अमर पाटील
भटक्या विमुक्त जाती जमाती - बयाजी शेळके
अनुसूचित जाती जमाती - डॉ. सुजित मिणचेकर
महिला प्रतिनिधी - सुश्मिता राजेश पाटील व अंजना रेडेकर.
सत्तारूढ आघाडी -
सर्वसाधारण - रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, अंबरीश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवकर, राजाराम भाटले, भारत पाटील-भुयेकर, प्रताप पाटील किंवा तानाजी पाटील, दादासाहेब सांगावे, एस. के. पाटील यांच्यासह ऐनवेळच्या तडजोडीत नवीन नावे येऊ शकतात.
इतर मागासवर्गीय - पी. डी. धुंदरे
भटक्या विमुक्त जाती जमाती- विश्वास जाधव
अनुसूचित जाती जमाती - दिनकर कांबळे
महिला प्रतिनिधी -अनुराधा पाटील व शौमिका महाडिक.