नोटाबंदी विरोधात कॉँग्रेस रस्त्यावर, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:49 PM2018-11-12T17:49:07+5:302018-11-12T17:50:56+5:30
भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व घटकांचे नुकसान झाले आहे; त्यामुळे ही नोटाबंदी नेमकी कोणासाठी झाली, त्याचे लाभार्थी कोण? काळा पैसा किती जमा झाला? अशी विचारणा करत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणला. नोटाबंदी करून सरकारने देशाला भिकेला लावल्याची टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
कोल्हापूर : भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व घटकांचे नुकसान झाले आहे; त्यामुळे ही नोटाबंदी नेमकी कोणासाठी झाली, त्याचे लाभार्थी कोण? काळा पैसा किती जमा झाला? अशी विचारणा करत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणला. नोटाबंदी करून सरकारने देशाला भिकेला लावल्याची टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
दुपारी बाराच्या सुमारास शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. सुरेश कुराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेधाचे फलक व पक्षाचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. यानंतर नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारचे करायचे काय?, मोदी सरकार हाय हाय? अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ‘सत्ताधाऱ्यांचा काळा पैसा पांढरा झाला’, ‘नोटाबंदी स्वतंत्र भारतातील मोठा घोटाळा’, ‘मोदीजी देशाची माफी मागा’ अशा लक्षवेधी फलकांद्वारे निषेध करण्यात आला.
यावेळी नोटाबंदीचा निर्णय घेऊन भाजप सरकारने देशाला भिकेला लावल्याची टीका कुराडे व चव्हाण यांनी केली.
दरम्यान, निवेदनाद्वारे नोटाबंदीने फायदा झालेले खरे लाभार्थी कोण? हे जाहीर करावे, चलनातून रद्द झालेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅँकेत जमा झाल्या, मग आता काळा पैसा कोठे आहे, हे स्पष्ट करावे, वाढणाऱ्या महागाईबद्दल असह्य का आहे?, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीबाबत काय प्रतिक्रिया आहे? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाचे दर उतरले असताना सध्या बाजारातील पेट्रोल व डिझेलचे दर का कमी होत नाहीत? असे विविध प्रश्न सरकारला विचारण्यात आले आहेत.
आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, महापालिका सभागृह नेता दिलीप पोवार, महिला बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, नगरसेविका वृषाली कदम, दीपा मगदूम, वनिता देठे, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, विक्रम जरग, रंगराव देवणे, संजय पोवार-वाईकर, एस. के. माळी, संपतराव चव्हाण, बयाजी शेळके, महंमदशरीफ शेख, नारायण लोहार, सुभाष सातपुते, दीपक थोरात, पार्थ मुंडे, दुर्वास कदम, विजयसिंह माने, दिग्विजय देसाई, आनंदा करपे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.