कोल्हापूर : गोकुळ संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव लोकशाही पद्धतीने मंजूर झाला आहे. विरोधकांना हे मंजूर नसेल तर त्यांनी वेगळी चूल मांडावी व दुसरा दूध संघ काढावा किंवा महालक्ष्मी दूध संघ चालू करावा, असे आव्हान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी रविवारी येथे दिले.संघाची सभा झाल्यानंतर महाडिक व्यासपीठावर आल्यानंतर समर्थकांच्या शिट्ट्यांनी मंडप दणाणून गेला. महाडिक म्हणाले, ‘विरोधकांना सभा गुंडाळायची होती. त्यांनी रडीचा डाव खेळू नये. हिंमत असेल तर मैदानात यावे. मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला, हे सामान्य दूध उत्पादकांचे यश आहे. विरोधकांनी जरी विरोध केला तरी संघात त्यांना यापुढेही सवतीची वागणूक दिली जाणार नाही. आम्ही त्यांना बरोबरीचीच वागणूक देऊ.’महाडिकही सकाळपासूनच तणावाखाली होते. सभेत गादीवर पुढच्या बाजूला बसले होते; परंतु तिथेही ते अस्वस्थ होते.सभा झाल्यानंतर पत्रकारांना भेटले तेव्हाही त्यांच्यासह संचालकांच्या चेहऱ्यावर सभा जिंकल्याचा भाव नव्हता; उलट विरोधक आत आल्याचीच चिंता दिसत होती.
विरोधकांनी दुसरा दूध संघ काढावा : महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:57 AM