कसबा सांगाव : कसबा सांगाव (ता. कागल) येथील मुश्रीफ गटाच्या वंदना माने या सरपंच पदासाठी अपात्र ठरल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज चालविण्यासाठी मंडलिक गटाचे उपसरपंच विक्रमसिंह जाधव यांना सहीचे अधिकार देण्यात यावेत, या ठरावाला बुधवारी अपात्र सरपंचांसह मुश्रीफ-राजे गटाच्या सदस्यांनी बहुमताने विरोध केला. सह्यांचे अधिकार गटातीलच नऊ सदस्यांपैकी एकाला देण्यात यावेत, असा ठराव केला. मंडलिक गटाच्या आठ सदस्यांनी उपसरपंचांना अधिकार देण्यात यावेत, असा ठराव केला. मात्र, कायद्यातील तरतुदींप्रमाणे सरपंचपद रिकामे असताना सह्यांचे अधिकार उपसरपंचांना आपोआप प्राप्त होतात. याबाबत विकास अधिकारी एस. के. कोळी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविले.महिन्यापूर्वी ग्रामसभा व ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बोलविली नाही. तसेच आर्थिक वर्षाचा आराखडा तयार केला नाही, अशी मुश्रीफ गटाच्या सरपंच वंदना माने यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, मंडलिक गटाच्या सुरेखा पाटील व इतर सात सदस्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना सरपंचपदावर राहण्यास अपात्र ठरविले होते. अपात्रतेमुळे गत १५ दिवसांपासून ग्रामस्थांची अनेक महत्त्वपूर्ण कामे खोळंबली होती. ती मार्गी लागावीत यासाठी नियमानुसार ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा उपसरपंच जाधव यांनी १० डिसेंबरला बोलाविली होती. त्यामध्ये उपसरपंचांना सह्यांचे अधिकार मिळावेत, असा विषय विषयपत्रिकेवर ठेवला होता. मात्र, कोरमअभावी ही सभा तहकूब करण्यात येऊन पुन्हा ती बुधवारी बोलाविण्यात आली होती.मुश्रीफ गटाने या ठरावाला विरोधाचे लेखी निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आबासाहेब पोवार यांनाही दिले आहे, तर उपसरपंच जाधव यांनी लोकांचे दाखले, उतारे, पाणीपुरवठा, स्वच्छता या मूलभूत गरजा असून, त्यांना त्या सोयी पुरविण्यासाठी सह्यांचे अधिकार उपसरपंचांना मिळणे गरजेचे असताना या ठरावास मुश्रीफ गटाने विरोध करून नागरिकांची गैरसोय करण्यास हे नऊ सदस्य जबाबदार राहणार आहेत, असे सांगितले. ग्रामविकास अधिकारी एस. के. कोळी यांनी घटनेचा इतिवृत्तांत गटविकास अधिकाऱ्यांना पाठविला आहे.उपोषणाचा इशारामुश्रीफ गटाने बहुमताने विरोध केला असून, तरीही उपसरपंचांना सह्यांचे अधिकार मिळाल्यास पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सह्यांचे अधिकार गटातीलच नऊ सदस्यांपैकी एकाला देण्यात यावेत, असा ठराव मुश्रीफ गटाचा मात्र कायद्यातील तरतुदींप्रमाणे सरपंचपद रिकामे असताना सह्यांचे अधिकार उपसरपंचांना आपोआप प्राप्त होतात.
उपसरपंचाच्या सहीच्या ठरावाला विरोध
By admin | Published: December 17, 2015 1:07 AM