कोल्हापूर : सध्या देशात सुरू असलेला साखर साठा मर्यादा, साखर आयात शुल्क व साखरेवरील इतर बंधनांबाबत बुधवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नवी दिल्लीत थेट पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळासमवेत भेट घेतली व राज्यातील साखरेवरील निर्बंधास विरोध दर्शविला. या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार संजयकाका पाटील, खासदार दिलीप गांधी, खासदार ए. टी. पाटील आदी उपस्थित होते. याबाबत शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही प्रकारे साखरेवर निर्बंध लादू नयेत, अशी विनंती केली. देशात ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असून दोन-तीन महिन्यांपासून तब्बल चार वर्षांनंतर साखरेचे दर पूर्ववत झाल्याने काही प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार चांगले पैसे मिळू लागल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी दोन-तीन महिन्यांत झालेल्या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली. एका बाजूला अतिरिक्त साखर अनुदान देऊन निर्यातीचे धोरण राबविले गेले असताना साखरेच्या दरवाढीमागे साठेबाज व काही कारखानदारांचे हितसंबंध आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. सध्याचे दर स्थिर असल्यास साठा मर्यादा आयात शुल्क रद्द करण्याची गरज नाही मात्र साखरेचे दर अवाजवी वाढले तर मात्र परत कारवाई करून निर्बंध लादावे लागतील, असे पंतप्रधानांनी शिष्टमंडळासमोर स्पष्ट केले. साखरेचा ३४०० ते ३६०० दर कारखाना स्तरावर योग्य असल्याचे खा. शेट्टी यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. कोणताही गाजावाजा न करता शेट्टी यांनी साखर उद्योगावर अपेक्षित असलेल्या निर्बंधास तीव्र विरोध दर्शविला व ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच साखर उद्योगाचे देखील हितचिंतक असल्याचे दाखवून दिले. (प्रतिनिधी)
साखर उद्योगावरील निर्बंधास विरोध
By admin | Published: April 27, 2016 11:55 PM