जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणातील सुप्रीम कंपनीच्या टोल वसुलीला आमचा विरोध असून, सक्तीने टोल वसुली सुरू झाल्यास जनआंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला जाईल़ यामुळे कंपनीला टोल वसुलीला परवानगी देऊ नये, अशा इशाऱ्याचे निवेदन सर्वपक्षीय अन्यायकारक टोलविरोधी कृती समिती जयसिंगपूरच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी अमित सैनी व बांधकाम विभागाला दिले़ कोल्हापूर-सांगली महामार्गांतर्गत १ मे पासून टोल सुरू करण्याच्या हालचाली झाल्यानंतर जयसिंगपूर येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने दोन बैठका घेऊन टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तयारी केली आहे़ सोमवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन टोल वसुलीला विरोध दर्शविला़ चौपदरी रस्त्याचा शिरोळ, इचलकरंजी, सांगली येथील बहुसंख्य वाहनधारक १० ते १२ किलोमीटरचा वापर करीत असताना सक्तीने व अन्यायकारक टोल वसुलीला प्रामुख्याने विरोध आहे़ चौपदरीकरणाचे संपूर्ण काम हे तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाचे असून, अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अजून हे काम अपूर्ण आहे़ त्यातच १ मे पासून टोल वसुलीचा घाट घातला जात आहे़ मुदतीत काम न झाल्यामुळे वाढलेल्या खर्चास कंपनी जबाबदार असताना वाढीव रकमेची जबाबदारी शासनाने न घेता कंपनीकडून वसूल करावी़ म्हणजेच शासनाच्या धोरणानुसार २०० कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांना टोल बसविला जाणार नाही़ शासनाकडे आपल्या भावना कळविल्या जातील, असे जिल्हाधिकारी सैनी यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले़ शिष्टमंडळात नगराध्यक्ष युवराज शहा, धनाजीराव चुडमुंगे, शैलेश आडके, अॅड़ संभाजीराजे नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, प्रकाश झेले, अमरदीप कांबळे, सुनील शेळके, रघुनाथ देशिंगे, शिवाजी माळी, बजरंग खामकर, भूपाल विभूते, संजय वैद्य, बबन यादव, चंद्रकांत जाधव यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
सुप्रीम कंपनीच्या टोलला विरोधच
By admin | Published: April 05, 2016 12:57 AM