कोल्हापूर : बिल्डर लॉबीचे चोचले पुरवण्यासाठी हद्दवाढ केली जात आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही हद्दवाढ होऊ देणार नाही, असा इशारा देत कोल्हापूर शहराजवळच्या २० गावांनी सोमवारी कडकडीत बंद पाळत हद्दवाढीच्या विरोधातील लढा आणखी तीव्र केला. आमचा हा शांततेचा आवाज मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री यांच्यापर्यंत पोहचला असेल तर त्यांनी आमच्याही भावना जाणून घ्याव्यात अन्यथा यापेक्षाही मोठा लढा उभारुन हद्दवाढीचा डाव हाणून पाडू, असा निर्धार या गावांनी केला.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या संदर्भात सोमवारी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी वडणगे, शिये, आंबेवाडी, नागदेववाडी, बालिंगा, वाडीपीर, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, मुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे, गोकुळशिरगाव, कंदलगाव, कणेरी, नागाव व शिरोली या २० गावांनी सर्व व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने उजळाईवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
गावातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, व्यापारी दुकाने, हॉटेल, सहकारी पतसंस्था यासह भाजी मंडई बंद ठेवण्यात आली. आंबेवाडी परिसरात गावकऱ्यांनी व व्यावसायिकांनी हद्दवाढीच्या विरोधात कडक बंद पाळला. एरवी प्रचंड गर्दी असणाऱ्या आंबेवाडीतील कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर अक्षरश: शुकशुकाट होता. प्रयाग चिखलीतही काही प्रमाणात बंद पाळण्यात आला. गोकुळ शिरगावमधील सर्व दुकाने, भाजी मंडई, शाळा, अंगणवाडी आणि इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते.कळंब्यात रॅली काढून निषेधकळंबा येथे जनजागृती रॅली काढून निषेध व्यक्त करत गाव बंद करण्यात आले. जबरदस्तीने हद्दवाढ केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सुमन गुरव यांनी दिला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी या बंदला पाठिंबा दिला.गडमुडशिंगी, वळीवडेत बंद, गांधीनगरमध्ये अल्प प्रतिसादगडमुडशिंगी, वळीवडे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठ गांधीनगर येथे दुकाने सुरू राहिल्याने बंदला अल्पसा प्रतिसाद मिळाला. गांधीनगर बाजारपेठेत काही दुकाने सुरू राहिली, तर काही दुकानांचे शटर अर्धवट उघडे ठेवून व्यवहार सुरू असल्याचे चित्र समोर आले. गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे व त्यांच्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी बंदचे आवाहन केले होते. व्यवहार सुरू राहिल्याने बंदला येथे अल्पसा प्रतिसाद मिळाला.
२०१७ साली प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. ज्याच्या माध्यमातून गावचा विकास करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यातून आजअखेर काहीच साध्य झाले नाही. प्रथम शहराचा विकास करा, त्यानंतर हद्दवाढीचा विचार करु. - सुमन गुरव, सरपंच कळंबा.कोपार्डे- शिंगणापूर, बालिंगा, हणमंतवाडी, नागदेववाडी गावांतील ३० ते ६० टक्के नागरी भाग पूरप्रवण झाला आहे. उरलेल्या भागात अगोदरच नागरीकरण झाले असून, आता जागाच शिल्लक नाही. मग या गावात हद्दवाढीचा काय उद्देश आहे? -रसिका पाटील, सरपंच, शिंगणापूर.हद्दवाढीला आमचा विरोध आहे हे नगरविकास मंत्र्यांना सांगण्यासाठी आम्ही हा बंद पाळला. या बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सरकार आता तरी आमचे ऐकेल अशी अपेक्षा आहे. अन्यथा हा लढा आणखी तीव्र करु. -सचिन चौगुले, समन्वयक, हद्दवाढ विरोधी कृती समिती, कोल्हापूर.आंबेवाडी, चिखली गावाचा हद्दवाढीला प्रखर विरोध असून, गावातील सर्व नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी हद्दवाढीच्या विरोधात कडक बंद पाळला. यावरून लोकांच्या विरोधाची तीव्रता दिसून येते. -सुनंदा मारुती पाटील, सरपंच आंबेवाडी.