कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला जिल्हा न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये जामीन मंजूर केला होता. मात्र, तावडे याच्या विरोधात भक्कम पुरावे मिळाले आहेत. तोच या गुन्ह्याचा सूत्रधार असल्यामुळे जामीन रद्द करावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी मंगळवारी (दि. २३) झालेल्या सुनावणीत केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे.पानसरे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दहा संशयित आरोपींना अटक केली असून, यापैकी समीर गायकवाड याला जामीन मंजूर झाला आहे. दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये मंजूर केला होता. त्याला विशेष सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जामिनाबाबत जिल्हा न्यायालयातच सुनावणी व्हावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी तावडे याचा जामीन रद्द करण्याचा अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल केला होता.मंगळवारी झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी जोरदार युक्तिवाद करून तावडे याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. तावडे हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून, त्याचा मारेकऱ्यांशी संपर्क होता. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र त्यानेच पुरवले होते. मारेकऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या बैठका घेणे, खुनाचा कट रचण्यात तावडे याचा सहभाग आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळू नये, असा युक्तिवाद ॲड. निंबाळकर यांनी केला.दुपारनंतर सुनावणीला सुरुवात झाल्याने केवळ विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद होऊ शकला. पुढील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे. सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यासह बचाव पक्षाच्या वतीने ॲड. समीर पटवर्धन आणि ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.बेळगावात बैठकडॉ. तावडे यानेच जानेवारी २०१६ मध्ये बेळगाव येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत सात जणांची उपस्थिती होती. त्यापैकी सागर लाखे याचा गौरी लंकेश खुनात सहभाग आहे. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यादिवशी लाखे कोल्हापुरात उपस्थित होता. कर्नाटक सीआयडीने घेतलेल्या जबाबातून ही माहिती समोर आल्याचे विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
पाच आरोपपत्रात पुरावेसुरुवातीच्या दोन आरोपपत्रात तावडे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा उल्लेख आहेच. त्यानंतर दाखल केलेल्या आणखी तीन आरोपपत्रात तावडे याच्या विरोधातील भक्कम पुरावे आहेत. यामुळे त्याला जामीन मंजूर होऊ नये, असा आग्रह ॲड. निंबाळकर यांनी धरला.