शिरोली : हद्दवाढीला ग्रामीण भागातील जनतेचा विरोध असेल तर हद्दवाढ करणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेटायला आलेल्या शिरोलीच्या शिष्टमंडळाला दिले. महापालिकेने हद्दवाढीचा घातलेला घाट हा ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. ही हद्दवाढ आम्हाला मान्य नाही, आम्हाला स्वतंत्र नगरपालिका पाहिजे. शिरोलीचा गेल्या १५ वर्षांपासून नगरपालिकेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे शिरोलीला तत्काळ नगरपालिका मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आयोजित करावी आणि नगरपालिका मंजूर करून द्यावी, अशी मागणी शिरोली ग्रामपंचायत आणि हद्दवाढविरोधी कृती समितीने पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली. यावर मंत्री पाटील यांनी, ग्रामीण भागातील जनतेला हद्दवाढ नको असेल तर हद्दवाढ लादणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे विदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. ते परत आल्यावर पुढील महिन्यात नगरपालिका मंजुरीबाबत बैठक आयोजित करू, असे ते म्हणाले. त्यानंतर शिष्टमंडळाने खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, हद्दवाढीला पहिल्यापासून माझा विरोध आहे. मी २० गावच्या लोकांच्या बरोबर असेन, असे सांगितले. तर आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी, हद्दवाढीला माझा विरोध आहे. नगरपालिका मंजूर करण्यासाठी मी सदैव शिरोली गावाबरोबर आहे. मुंबईत नगरपालिका मंजुरी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच राजू चौगुले, सलिम महात, अनिल खवरे, बाजीराव पाटील, विजय जाधव, सतीश पाटील, सुभाष चौगुले, बापू पुजारी, गोविंद घाटगे, शिवाजी समुद्रे, मारुती वंडकर उपस्थित होते.
गावांचा विरोध...तर हद्दवाढ नाही
By admin | Published: June 15, 2015 12:39 AM