कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बाहेरील बाजूस असणारे ४२ दुकानगाळे काढून घेण्याची नोटीस आयुक्त पी. शिवशंकर यांनी गाळाधारकांना दिली आहे, तर त्याला काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. यासंबंधी गुरुवारी महापौर कक्षात आयोजित केलेल्या बैठकीस आयुक्त गैरहजर होते, त्यामुळे दुकानगाळ्यांवरून लोकप्रतिनिधी व प्रशासन असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत पूर्वी गांधी मार्केट होते. या इमारतीची उभारणी सन १९२९ मध्ये झाली. त्यानंतर या इमारतीत बाहेरील बाजूस असणारे ४२ दुकानगाळे भाड्याने देण्यात आले. आजही या दुकानगाळ्यांत मालकी वहिवाटीने सन १९३९ पासून काही जण व्यवसाय करत आहेत. जुनी कुळे असल्याने त्यांना भाडे चारशे ते पाचशे रुपये प्रतिमहिना असल्याचे सांगण्यात येते. या सर्व दुकानगाळेधारकांना आयुक्त पी. शिवशंकर यांनी एक नोटीस पाठवून १८ फेब्रुवारीपर्यंत दुकानगाळे खाली करा, अन्यथा ते कारवाई करून ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांच्या नोटिसीमुळे दुकानगाळेधारक हवालदिल झाले असून त्यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून महापौर, उपमहापौर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. वर्षानुवर्षे व्यवसाय करत असून आता जर गाळे काढून घेतले तर आमचे जीवन उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्यांनी बोलून दाखविली आहे. दुकानगाळे काढून घेण्यामागचे कारण सांगताना प्रशासनाने मुख्य इमारतीत गटनेते, पदाधिकाऱ्यांना जागा अपुरी पडत असल्याचे नोटिसीमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे दुकानगाळेधारक हे पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसले आहे. गुरुवारी महापौर अश्विनी रामाणे यांनी यासंदर्भात एक बैठक आयोजित केली होती. त्याला आयुक्त गैरहजर होते. उपायुक्त विजय खोराटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले आदी अधिकारी उपस्थित होते तसेच उपमहापौर शमा मुल्ला, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, गटनेते शारंगधर देशमुख (काँग्रेस),सत्यजित कदम (ताराराणी), नियाज खान (शिवसेना), विजय सूर्यवंशी (भाजप)आदी बैठकीस उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी गाळेधारकांना हटवू नये, असे ठणकावून सांगितले. बैठकीतील पदाधिकाऱ्यांच्या भावना आयुक्तांच्या कानावर घाला, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. संभाजी जाधव, सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी यांनी दुकानगाळे तुम्ही तुमच्या अधिकारात काढून घेणार असाल तर आम्ही त्याला विरोध करू; परंतु पदाधिकाऱ्यांच्या कक्षासाठी जागा पाहिजे आहे, असा समज व्यापारीवर्गात पसरवू नका, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना ठणकावले.
मनपाचे दुकानगाळे परत घेण्यास विरोध
By admin | Published: January 29, 2016 12:25 AM