कोल्हापूर : राष्ट्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रस्तावित केलेल्या प्रत्यक्ष करविषयक सुधारणा व तरतुदी या करदात्यांविरोधी आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरले. याउलट सरकारने प्रथमच करदात्यांना स्वत:च्या आर्थिक भवितव्याचे स्वरूप ठरविण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ करतज्ज्ञ सीए संजय व्हनबट्टे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे सीए इन्स्टिट्यूटची कोल्हापूर शाखा व दि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या ज्येष्ठ नागरिक व पगारदार आयकर दात्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.व्हनबट्टे म्हणाले, या नवीन प्रस्तावांमुळे संभ्रमित व्हायचे काहीच कारण नाही; उलट नवीन पद्धतीच्या पर्यायाकडे एक संधी म्हणून पाहावे. याप्रसंगी कोल्हापूर शाखेचे माजी अध्यक्ष सीए धनंजय (डी. एस.) पाटील व सी. ए. केदार कुंभोजकर यांच्यासोबत त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी सीए इन्स्टिट्यूटच्या कोल्हापूर शाखेचे विद्यमान अध्यक्ष सीए अमित शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष सीए गिरीष सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. सीए सुशांत गुंडाळे यांनी आभार व्यक्त केले. संस्थेचे माजी अध्यक्ष सीए नीलेश भालकर व निधीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ सीए शरद सामंत यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शाखा प्रभारी स्वप्निल सादळे, विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष आदित्य कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यांनी केले मार्गदर्शनसीए शरद सामंत, सीए केदार कुंभोजकर यांनी अर्थसंकल्प २०२० मधील ठळक मुद्दे स्पष्ट केले. सीए डी. एस. पाटील यांनी आयकरविषयक नवीन पद्धतीचा पर्याय अवलंबिल्यास करदात्यांच्या हातात उपलब्ध राहणाऱ्या अतिरिक्त निधीच्या यथायोग्य गुंतवणुकीविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.