प्रवीण देसाई -कोल्हापूर -पारंपरिक सुवर्ण कारागिरी व सराफी व्यवसायात आधुनिकतेची कास धरीत दैवज्ञ समाजाने गरुडभरारी घेतली आहे. एकमेकांना साहाय्य करीत या समाजाने एकजूट कायम ठेवली आहे. या व्यवसायाबरोबरच आताची पिढी शिक्षण, नोकरी, उद्योगपती, डॉक्टर, वकील, इंजिनिअर अशा विविध क्षेत्रांत नाव उंचावून स्थिरावताना दिसत आहे. शंभर वर्षांहून अधिक काळापासून वास्तव्य असणाऱ्या या समाजाने इथल्या मातीशी एकरूप होेऊन नाळ कायम ठेवली आहे. मनमिळावू व निरुपद्रवी असलेल्या या समाजबांधवांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.पूर्वी हा समाज सुवर्ण कारागिरी, सराफी व्यवसाय, जमीनदारी, सावकारी अशा उद्योगांत मग्न होता. तेव्हा कोल्हापुरातील दैवज्ञ बांधवांची संख्या पन्नास ते पंच्याहत्तर इतकी असावी. चार-पाच मोठी घराणी व बाकीचे कारागीर या वर्गात अंतर्भाव होणारे; परंतु समाजातील पुढाऱ्यांना समाज संघटित व एकसंध नसल्याची खंत होती. त्यातच समाजातील एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता होती. ती रक्कम जमविण्यासाठी व समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी समाजाची बैठक बोलाविण्यात आली. समाजातील लोकांमध्ये जागृती करणे, त्यांना शिक्षण देऊन सुविचारी बनविणे व समाज संघटित करणे या उद्देशाने २४ डिसेंबर १९०८ रोजी ‘दैवज्ञ समाज बोर्डिंग’ची स्थापना करण्यात आली. जनार्दन केळवेकर, शिवराम उपळेकर, गणेश जामसांडेकर, हरी साळवणकर, दत्तात्रय पाटगावकर, गोविंद जामसांडेकर, वामन उपळेकर, आदी मंडळींनी अथक परिश्रम घेऊन बोर्डिंगची स्थापना केली. या ठिकाणी संस्थेच्या विचारविनिमयासाठी वरचेवर बैठका होऊ लागल्या. प्रत्येकजण समाजबांधवांना व्यवसायासाठी मदत करू लागला; परंतु संस्थेची स्वत:ची जागा नसल्याने वरील सर्व मंडळींनी राजर्षी शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना ही अडचण सांगितली. त्यांनी तातडीने मंगळवार पेठेतील जागेसह इमारत बांधून दिली. त्याबरोबरच वर्षाला १८० रुपये अनुदान मंजूर केले. संस्थेस भाड्याचे उत्पन्न मिळावे म्हणून गंगावेशमध्ये दुसरी जागा देण्यात आली. त्यावर बांधलेल्या इमारतीच्या उत्पन्नातून संस्थेचा खर्च चालत असे. अशा प्रकारे ही संस्था स्वत:च्या जागेत स्थिर झाली. बोर्डिंगमध्ये सर्व जातिधर्मांच्या मुलांना प्रवेश व मोफत जेवण हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.कोकणासह गोव्यातून आलेला हा समाज व्यवसायानिमित्त या ठिकाणी येऊन स्थिरावला. पूर्वी हाताच्या बोटांवर असणारी कुटुंबांची संख्या आता वाढून हजाराच्या घरात गेली आहे. एकूण सराफ बाजारपेठेतील सराफ व सुवर्ण कारागिरांचे जवळपास ९० टक्के प्रमाण हे या समाजाचे आहे. प्रत्येक घरातील एक व्यक्ती ही सोनारकाम व सराफ व्यवसायात आहे. शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या गुजरी, भेंडे गल्ली, कासार गल्ली, जोतिबा रोड, फडणीस बोळ, आझाद गल्ली, परीट गल्ली, दैवज्ञ बोर्डिंग परिसर येथे सुवर्ण कारागिरांचे व्यवसाय आहेत. प्रामुख्याने कोल्हापुरी पद्धतीचे दागिने करण्यावर भर आहे. यामध्ये कोल्हापुरी साज, ठुशी, बुगडी, मनी, आदी दागिने बनविले जातात. त्याला आधुनिकतेची जोड देत आताच्या पिढीने नवीन तंत्रज्ञान व मशिनरींच्या साहाय्याने या दागिन्यांच्या माध्यमातून कोल्हापूरची ओळख देशपातळीवर निर्माण केली आहे. हा समाज आता फक्त आपल्या पारंपरिक व्यवसायापुरताच मर्यादित न राहता इतर क्षेत्रांतही झेपावलेला दिसत आहे. शिक्षणासह शासनाच्या विविध खात्यांत अधिकारी, उद्योगपती, डॉक्टर, इंजिनिअर, वकील अशा ठिकाणी समाजबांधव कार्यरत आहेत. निरुपद्रवी व मनमिळावू स्वभावाच्या या समाजाने कोल्हापूरला आपलेसे केले आहे.समाजाचे माणिक-मोतीजनार्दन केळवेकर, शिवराम उपळेकर, गणेश जामसांडेकर, दत्तात्रय पाटगावकर, हरी साळवणकर, केशव सोळांकूरकर, कृष्णाजी कारेकर, बाबूराव कारेकर, महादेव पावस्कर, प्रा. नरहर कारेकर, अॅड. बापू देवरुखकर यांच्यासह आताच्या काळातील डॉ. शशिधर कुडाळकर, डॉ. पद्माकर भद्रे, सुभाष भुर्के, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, प्राचार्य के. डी. पेडणेकर, अॅड. व्ही. व्ही. बांदिवडेकर, अनिल लवेकर, चिंतामणी भुर्के, दिलीप भुर्के, सुजय पोतदार, विजय पावस्कर, आदी या समाजाचे माणिक-मोती आहेत.दैवज्ञ समाज कोल्हापूरच्या मातीशी एकरूप आहे. एकमेकाला मदत करून समाजबांधवांना हात देण्याचा या समाजाचा स्वभाव आहे. पारंपरिक व्यवसायाला आता आधुनिकतेची किनार मिळाली आहे. या व्यवसायाबरोबरच इतर क्षेत्रांतही समाजातील मान्यवरांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.- सुधाकर पेडणेकर, अध्यक्ष, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगसमाजाची ओळखजिल्ह्यात समाजबांधवांची एकूण संख्या तीस हजारांच्या घरात आहे. त्यातील दहा हजारांहून अधिक लोक शहरात राहतात. शहरासह आसपासच्या उपनगरांत त्यांचे वास्तव्य आहे. समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन कळंबा परिसरात सुवर्णभूमी कॉलनी व जवाहर नगरात विश्वकर्मा हौसिंग सोसायटी स्थापन केली आहे.दैवज्ञ समाजाच्या बोर्डिंगशेजारी दत्तात्रय कारेकर व सहकाऱ्यांनी १९६२ मध्ये सांस्कृतिक हॉल बांधला. त्यामुळे संस्थेला चांगले उत्पन्न मिळू लागले. सध्या हॉलमध्ये लग्न, मुंजी, साखरपुडा, वाढदिवस, राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे, बैठका, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध जातिधर्मांतील विवाह पार पडतात. कोल्हापूरकरांना आपलेसे वाटणारा हा हॉल एक सांस्कृतिक केंद्र बनला आहे.समाज बोर्डिंगचे पदाधिकारीअध्यक्ष- सुधाकर पेडणेकर, उपाध्यक्ष- भानुदास भुर्के, सचिव- विजय घारे, उपसचिव- सतीश शिर्वटकर, खजानीस- पद्माकर नार्वेकर, सुपरिटेंडेंट- रत्नाकर नागवेकर, सदस्य- किशोर कारेकर, समीर नार्वेकर, गजानन भुर्के, संजय कारेकर, सागर चिंचणेकर, गजानन नागवेकर, संदीप कडणे, जयवंत बेलवकर, महेंद्र जामसांडेकर, गिरीश चोडणकर, गजानन नार्वेकर, पांडुरंग पेडणेकर, प्रवीण चोडणकर. व्यवस्थापक- शेखर देवरुखकर, निरीक्षक- सुनील कडणे, मदन चोडणकर, दामोदर भुर्के, श्रीकांत कारेकर, संजय कारेकर, विजयकांत मालंडकर.
आधुनिकतेची कास धरणारा ‘दैवज्ञ’ समाज
By admin | Published: March 29, 2015 11:50 PM