तानाजी पोवार ।कोल्हापूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या, पण या विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या तपासणीमध्ये मात्र हयगय होत असल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन विभागाने (आर.टी.ओ.) स्कूल बस ३१ मेपूर्वी तपासणी करून घेण्याचे आदेश देऊनही सुमारे ६० टक्के स्कूल बसचालकांनी या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखविली आहे. या सुमारे ४५५ विनातपासणी केलेल्या स्कूल बस शुक्रवारपासून सुसाट वेगाने धावत आहेत. या स्कूल बसचालक व संस्थांना ‘आर.टी.ओ’ने नोटिसा बजावल्या आहेत.
महाराष्ट मोटार वाहन नियमावलींतर्गत स्कूल बस नियम व विनियम २०११ प्रमाणे शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना तसेच विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया स्कूल बसचालकांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सुटीच्या कालावधीत ३१ मे २०१८ पर्यंत तपासणी बंधनकारक केली होती. स्कूल बसचे थांबे निश्चित करणे, शाळेतील मुलांची ने-आण सुरक्षितपणे करणे, वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, स्कूल बसमध्ये एक प्रशिक्षित चालक, एक पुरुष व महिला परिचर असणे, सर्व कर्मचारी स्वच्छ गणवेशात ओळखपत्रांसह असणे, आपत्कालिन खिडकी, दरवाजा उघडल्यानंतर गजर वाजणे याची तपासणी केली जाते.अवघ्या २९९ स्कूल बसची तपासणीशहर आणि जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी सुमारे ७५४ स्कूल बसची नोंद असून यामध्ये खासगी २७२ तर शाळा मालक ४८२ स्कूल बस आहेत. यापैकी २९९ स्कूल बसचालकांनी आरटीओकडून रितसर बसची तपासणी करून घेतली आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ध्यानात ठेवून सुटीदिवशीही विशेष मोहीम राबवून या स्कूल बसची तपासणी करून घेणार आहे.- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर