इचलकरंजी : येथील सांगली रोडवरील ५५ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या एका मॉलला बेकायदेशीररीत्या तीन नळ जोडणी दिलेल्या प्रकरणाची पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जलअभियंत्यांना दिले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
व्यावसायिक मॉलची थकबाकी असतानाही बांधकाम अथवा पाणीपुरवठा विभागाची कोणतीही परवानगी न घेता काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून नवीन तीन नळ जोडणी घेण्यासाठी नव्याने केलेला रस्ता उकरण्याचे काम सुरू होते. हा प्रकार नगरसेवक इकबाल कलावंत यांच्यासह भागातील नागरिकांनी उघडकीस आणून काम बंद पाडले होते. हा प्रकार चव्हाट्यावर आल्याने नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. या घटनेचे वृत्त प्रसारित होताच सभापती चोपडे यांनी या जोडणी मंजुरीसाठी काय प्रक्रिया केली? याला जबाबदार कोण आहेत? जोडणी अनधिकृत आहेत का, याबाबत संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, संबंधित मालमत्ताधारक, प्लंबर व संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी कलावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.