लोकमतन न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शाहूनगर चौकातील विकास बीअरबार तसेच कंदलगावमधील पनामा कॅफे स्पोर्ट्स लॉच........ यावर राजारामपुरी पोलिसांनी टाकलेल्या छापा प्रकरणाची सखोलपणे चौकशी करणार आहे, त्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
राजारामपूरी पोलिसांनी गेल्या महिन्यात विकास बिअरबार आणि कंदलगाव मधील पनामा स्पोर्ट्स कॅफेवर छापा टाकल्यानंतर पडद्यामागे काही देवघेवीच्या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतने मंगळवारच्या अंकात प्रकाशझोत टाकला. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली. ‘पनामा’वर रात्रीच्या वेळी छापा टाकून बॅटरीच्या उजेडात पोलिसांनी जणू दरोडाच टाकल्यासारखा सीसी फुटेज व्हायरल झाले. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी घेतली आहे. छापा टाकण्यापूर्वी अगर छाप्यानंतर त्याची नोंद पोलिसांच्या ‘सीसीटीएनएस’वर नोंद केली होती का? याचीही माहिती घेण्यास सांगितले आहे. या छाप्याचे सीसी फुटेजही त्यांच्या हाती लागले आहे. वृत्त प्रसिध्द होताच अधीक्षक बलकवडे यांनी सखोलपणे माहिती घेतली. मंगळवारी सकाळी शहर पोलीस उपअधक्षक मंगेश चव्हाण यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी या प्रकरणाबाबत चर्चा केली, त्यांचीच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाबाबत सखोलपणे चौकशी करून आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. अहवाल आल्यानंतर दोषीवर निश्चित कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.