जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.)
यांचे गटविकास अधिकाऱ्यांना
प्रकाश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) यांनी सर्व तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत हद्दीतील महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मर, उच्च दाबाच्या विद्युत वितरण वाहिन्यांचे टॉवर व विद्युत खांबांवर कर आकारणीचे आदेश दिले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना देण्याचे आदेश दिले आहेत व त्याबाबत केलेल्या कारवाईचा अहवालही देण्याचे कळविले आहे. यामुळे महावितरणला आणखी एक धक्का बसला आहे.
हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने महावितरणला ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या विद्युत खांब, विद्युत वितरण टॉवरवर ग्रामपंचायतीने कर आकारणीची नोटीस बजावली होती. याबाबत माणगाव ग्रामपंचायतीने थेट उच्च न्यायालयात दाद मागितली. ग्रामपंचायतच्या बाजूने निकाल देताना कोणत्याही सेवा देणाऱ्या व्यवस्था ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कर आकारणीस पात्र असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत कर आकारणीवर चर्चा करण्यात आली होती. या सभेत महावितरणचे ग्रामपंचायत हद्दीत असलेले ट्रान्स्फॉर्मर, विद्युत वितरण टॉवर व विद्युत खांबावर ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कर आकारणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबतचे आदेश नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) अरुण जाधव यांनी दिल्याने महावितरणवर कर आकारणीला ग्रामपंचायतींना अधिकार व बळ मिळाले आहे.
चौकट
कुडित्रे ग्रामपंचायतीने केला होता प्रथम प्रयत्न - २०१४/१५ मध्ये कुडित्रे (ता. करवीर) येथील माजी सरपंच बाळ पाटील यांनी महावितरणला कर आकारणीची नोटीस पाठवली होती. महावितरणने ती धुडकावली होती; पण माणगाव ग्रामपंचायत व सरपंचांनी याचा पाठपुरावा केल्याने महावितरणला कर झटका दिला आहे.