राजाराम लोंढेकोल्हापूर : प्राथमिक दूध संस्थांमध्ये फॅट टेस्टिंगच्या नावाखाली दूधउत्पादक शेतकऱ्यांकडून रोज १५० मि.लि. दूध घेतले जाते. संस्थांच्या या मनमानीला आता चाप बसणार असून, फॅटसाठी फक्त २० मि.लि.च दूध घेता येईल, असा आदेश लवकरच दुग्ध आयुक्त कार्यालयाकडून निघणार आहे.दुधाचे फॅट व एस.एन.एफ.वर दर अवलंबून असल्याने त्याची गुणवत्ता तपासणी करूनच दूध स्वीकारले जाते. फॅट तपासणीसाठी किती दूध घ्यायचे, याचे काहीच नियम नाहीत. त्यामुळे संस्थाचालकांना जसे वाटेल त्याप्रमाणे माप तयार करून त्यातून दूध घेतले जाते. फॅटचे टेस्टिंग केल्यानंतर शिल्लक राहिलेले दूध संबंधित दूध उत्पादकाला परत करणे अपेक्षित असते. दूध घेण्याचे माप हे प्रत्येक संस्थेत वेगवेगळे असते, काही ठिकाणी ५० मि.लि. तर काही ठिकाणी तब्बल १०० मि.लि. दूध टेस्टिंगसाठी घेतले जाते. सकाळ व सायंकाळ दोन्ही वेळचे सरासरी १५० मि.लि. दूध फॅटसाठी घेतले जाते, पण प्रत्यक्षात फॅट टेस्टिंग मशीन ५ ते १० मि.लि.पेक्षा कमी दूध घेते. उर्वरित दूध संस्था ठेवते.पहाटे पाच वाजल्यापासून जनावरांसारखे राबून हा व्यवसाय शेतकरी करतात. संस्थेला दूध कमी पडेल म्हणून स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आणि घरातील मुलांच्या तोंडावर मारून दुधाचा थेंब आणि थेंब संस्थेला पाठवण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असते, पण दूध संस्थेत आले की फॅटच्या नावाखाली त्यातील ५० पासून १०० मि.लि.पर्यंत काढून घेतले जाते. फॅटसाठी रोज २०० मि.लि दूध गेले तर दहा रुपयांचा भुर्दंड शेतकºयाला बसतो. महिन्याचे तीनशे-चारशे रुपये तोटा होत असल्याने याबाबत संभाजी ब्रिगेडने तक्रार केली होती. दुग्ध विभागाने हा विषय गांभीर्याने घेतला असून, फॅटसाठी २० मि.लि.पर्यंतच घेता येईल, असा फतवा या विभागाकडून निघणार आहे.फॅटच्या नावाखाली रोज १०-१५ लीटर दूधफॅटच्या नावाखाली घेतलेले दूध स्वतंत्र ठेवले जाते. लहान संस्थेत रोज किमान ७-८ लिटर, तर मोठ्या संस्थेत १५ लिटरपर्यंत हे दूध जमा होते. अनेक संस्था स्वतंत्र खात्यावर घेऊन रीतसर ताळेबंदाला हे पैसे दाखवतात, पण अनेक संस्थांमध्ये त्याचा हिशेबच दाखविला जात नाही.१५-२० मि.ली.चीच गरजदुग्ध आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील अनेक संस्थांना भेटी देऊन फॅट टेस्टिंगसाठी घेतल्या जाणाºया दुधाची तपासणी केली. यामध्ये फॅटसाठी जास्तीत जास्त १५ ते २० मि.लि. दूध लागते, असे निदर्शनास आले.
फॅटसाठी आता २० मिली दूध, दुग्ध आयुक्तांचा लवकरच आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 5:06 AM