या शेताने लळा लावला असा कीसुख-दु:खांना परस्परांशी हसलो, रडलो,आता हा तर जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो....सुप्रसिद्ध कवी ना. धो. महानोरांच्या शेती संदर्भातील या ओळी एका अवलीयाला तंतोतंत लागू पडतात. त्याचं नाव आहे जितेंद्र मारुती कदम. जावळी तालुक्यातीलच रायगाव येथील या शेतकऱ्याचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. दहावीला ७२ टक्के गुण मिळवूनही घराची परिस्थती बेताची असल्याने पुढे शिक्षण घेता आले नाही. तब्बल आठ कॉल हातात असताना मूळचा रानवेडा स्वभाव स्वस्थ बसू देत नव्हता. शेती की नोकरी, या दोलायमान अवस्थेत मनानं कौल दिला शेतीचा सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या. पाणी पैसा या अडचणींवर इच्छाशक्तीनं मात केली. आणि स्वत:च्या मातीत विक्रमी आल्याचं उत्पादन घेतलं. केवळ २५ गुंठ्यांत १३७ क्विंटल आल्याचे उत्पन्न मिळाले. जोडीला कलिंगडची शेती केली. १९९६ रोजी शेतीची सुरुवात झाली. हळूहळू जोडधंदे सुरू झाले. २००४ रोजी यशस्वी रेशीम उद्योग केला. अवतीभोवती काहीही पिकत नसताना या शेतकऱ्याने घामाचे सोने केले. स्ट्रॉबेरीचं दीडशे ते पावनेदोनशे ग्राम वजन असलेलं पीक घेण्याची किमया केली. कालांतराने त्यांना सेंद्रिय शेतीची गरज भासू लागली. दोन वर्षांपासून संपूर्णपणे सेंद्रिय शेती सुरू आहे. त्यासाठी गांडूळखत, मृदापरीक्षण, जीवामृत या अभिनव गोष्टींचा अवलंब केला जातो. हे सर्व करत असताना स्पिरुलीना या जैविक शैवाल शेतीचा यशस्वी प्रयोग या शेतकऱ्याने केला आहे. रोज दहा किलो ओले शैवाल उत्पादीत करून एक किलो पावडरचे उत्पन्न घेतले जात आहे. दोन यांत्रिक युनिटमधून ही शेती सुरू आहे. जितेंद्र कदमांच्या या आधुनिक उपक्रमास जिल्हाभरातून भेट देण्यासाठी लोक येत आहेत. नुकतेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. तुम्ही मातीसाठी जगला तर ती तुम्हाला उपाशी मरू देणार नाही, असं साधं तत्त्वज्ञानावर त्यांची अव्याहत वाटचाल सुरू आहे व राहील.आजवर मिळालेले पुरस्कारआ. शशिकांत शिंदे कृषी उद्योग प्रदर्शन - आदर्श शेतकरी २०१०/२०१३सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार - २०१२ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट बेस्ट रिजल्ट २०१३प्रयोगशील युवा शेतकरी २०१३ नाशिककृषीरत्न पुरस्कार (स्वामी विवेकानंद सामाजिक संस्था) २०१४
हातातील आठ नोकऱ्या सोडून सेंद्रिय शेती
By admin | Published: January 17, 2016 11:55 PM