कोल्हापूर : सेंद्रिय भाजीपाला, मधुमेहासाठीचा अलिबागचा तांदूळ, वरणा-भाकरी, नाचण्याची भाकरी याचे आकर्षण ‘ताराराणी महोत्सवा’मध्ये शनिवारी पाहायला मिळाले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद लाभत लाखाच्या वर उलाढाल झाली. महिला बचत गटांतर्फे विविध पदार्थांच्या उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये विशेषत: महिलांनी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर उपस्थिती दर्शविली होती. महोत्सव पाहण्याकरिता येणाऱ्यांच्या मनोरंजनासाठी ‘माझी मायबोली’ राधानगरी प्रस्तुत ‘गाथा महाराष्ट्राची’ हा संगीतमय कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी तीन लाख २८ हजार रुपयांची उलाढाल झाली. शुक्रवार (दि. १२) पासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हास्तरीय ‘ताराराणी महोत्सव २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, नाशिक, जळगाव, आदी जिल्ह्यांतील महिला बचत गटांनी स्टॉल्स उभे केले आहेत. यामध्ये कोल्हापुरी चप्पल, गूळ व काकवी, कोल्हापुरी साज, कापडी पिशव्या, बेदाणे, हळद, कंदी पेढे, सॉफ्ट टॉईज, मातीची भांडी यांसह विविध प्रकारची लोणची-पापड, लाकडी खेळणी, आदी वस्तू घेण्यासाठी सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती. मात्र, दुपारनंतर फारशी गर्दी नव्हती. त्यानंतर सायंकाळी पाचनंतर महोत्सवाला पुन्हा गर्दी वाढू लागली. ती रात्रीपर्यंत होती. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील दुर्गादेवी महिला बचत गटाने सेंद्रिय शेती व शेतीउपयुक्त वस्तू, तर गुलाबजामून, विविध प्रकारच्या चटण्या, पापड, राजगिरा व चिरमुऱ्याचे लाडू खरेदीसाठी गर्दी होती. त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पल, तयार केलेले कपडे, आजरा घनसाळ, इंद्रायणी, रत्नागिरी २४ तांदूळ, नॅपकीन, घोंगडी, मातीची भांडी, सॉफ्ट टॉईज महोत्सवात होते. ( प्रतिनिधी) झुणका-भाकरीवर ताव ४महोत्सवात खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामध्ये बहुतांश शाकाहारी पदार्थांचे स्टॉल जास्त होते. ४महोत्सवात २० रुपयांना झुणका-भाकरी होती. त्यामुळे बहुतांश जणांनी तिच्यावर ताव मारला. याचबरोबर वरणा-भाकरी, नाचणी व ज्वारी एकत्र करून केलेली भाकरी होती. तसेच कोल्हापुरी मिसळ, नाशिकचे प्रसिद्ध मांडे (पुरणपोळी), आदी खाद्यपदार्थांची विक्री जोरात सुरू होती.
सेंद्रिय भाजी, अलिबाग तांदळाचे आकर्षण
By admin | Published: February 14, 2016 1:03 AM