कोल्हापूर : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच नाताळचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ख्रिस्ती बांधवांचा सणाच्या तयारीला वेग आला आहे. घराघरांत येशूच्या जन्माचा प्रसंग साकारण्यात ख्रिस्ती बांधव मग्न आहेत. यानिमित्ताने शहरातील विविध चर्चसह घरांमध्येही रंगरंगोटी आणि रोषणाई करण्यात आली आहे. नाताळानिमित्त घरोघरी ख्रिसमस ट्री सजविले जात असून, त्यावर विद्युत रोषणाईच्या माळा, बेल, ग्रीटिंग्ज लावली जातात. याशिवाय घरांना झुरमुळ्या, सांताक्लॉजच्या कटआउटने सजविण्यात सारे मग्न झाले आहेत. मध्यरात्री नाताळच्या गाण्यांवर नृत्य केले जाते आणि सकाळी विविध चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. कोल्हापुरातही मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ख्रिसमस साजरा केला जातो. मुख्य दिवस जवळ येऊन ठेपल्याने ख्रिस्ती बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. चर्चच्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि फेस्टिव्हलचेही आयोजन करण्यात आले आहे. वायल्डर मेमोरिअल चर्चमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगत असून, रात्री उशिरापर्यंत भक्तिसंगीत आणि नाटिकांच्या माध्यमातून येशूप्रती प्रेम, आदर व्यक्त केला जात आहे. त्यासह आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमध्ये फळे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त रविवारी (दि. २५) सकाळी ९ वाजता विशेष उपासना सभा होणार आहे. तसेच यानिमित्त संडे स्कूल प्रदर्शन, कॅँडल लाईट सर्व्हिस, विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणाच्या तयारीसाठी पापाची तिकटी येथे ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य, केक-चॉकलेट्स, आप्तेष्टांना देण्यासाठी आकर्षक गिफ्टस्ची खरेदी केली जात आहे. तसेच घरोघरी सजावट करण्याची लगबगही दिसत आहे. अनेकांच्या घरांवर चांदण्या आणि आकाशकंदीलही झळकले आहेत. रात्रीच्या वेळी मित्र आणि आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची ख्रिस्ती समाजात परंपरा आहे. त्यामुळे रात्री दहा वाजल्यानंतर तरुणांचे ग्रुप वाद्यांसह मित्रांच्या घरी जाताना दिसत आहेत. खासबाग मैदान येथून रॅलीची सुरुवातख्रिस्तजन्म उत्सवानिमित्त आज, शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता खासबाग मैदान येथून ‘ख्रिसमस सुवार्ता रॅली’ काढण्यात येणार आहे. ख्रिस्तांच्या जन्मोत्सवानिमित्त पवित्र वचने, घोषणा देत व ख्रिस्ती भक्तिगीते गात, लहान मुलांना चॉकलेट वाटप करीत सासने मैदान येथे या रॅलीची सांगता होईल. यावेळी शांततेसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात येणार आहे. तसेच येशू चरित्र, नवा करार, आदी पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
शहरात ख्रिसमस सुवार्ता रॅलीचे आज आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 12:48 AM