कोल्हापूर : महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनी मल्लखांब, रोप मल्लखांब, रिंग, डंबेल्स, आदी मैदानी खेळांशी संबंधित एक ना अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.मोबाईल, आधुनिक सुविधांच्या जगात मैदानी खेळांकडे आजची पिढी दुर्लक्ष करू लागली आहे. त्यात विद्यार्थ्यांना मल्लखांब, रोप मल्लखांब, योगासने, रानपा, रिंग, डंबेल्स, निशाण, झिरमिळ्या, लेझीम, सायलेंट ड्रिल, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अशा खेळांची आवड व ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या शारीरिक शिक्षण प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते.
प्रात्यक्षिकांची सुरुवात पाचवी ते नववीच्या दोन हजार मुला-मुलींनी मास पीटी, भारतीयम्, बैठे प्रकार सादर केले. त्यानंतर याच मुलांनी ‘उठा राष्ट्रवीर हो’ हे देशभक्तिपर गीत सादर केले. त्यानंतर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘हे गणराया’ हे भक्तिगीत सादर केले. त्यानंतर २५० विद्यार्थ्यांनी रिंग, डंबेल्स, निशाण, झिरमिळ्या अशी साहित्य कवायत उत्कृष्टरीत्या सादर केली.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सादरीकरणात योगासने, ओडिसी नृत्य, लेझीम, सायलेंट ड्रिल, मल्लखांब, रोप मल्लखांब, लष्करावर आधारित ‘संदेसे आते है’ या संकल्पनेचे सादरीकरण केले; तर पंजाबी भांगडा नृत्य आणि पारंपरिक धनगर नृत्याने कार्यक्रमाला साज चढविला. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, स्काऊटचे संदेशन, ºिहदमिक योगा, आर.एस.पी. (सिग्नल पी.टी.), आदर्श चौक अग्निशमन प्रात्यक्षिके अशा एक ना अनेक रंगतदार व चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मने जिंकली.या कार्यक्रमाचे उद्घाटन एन. सी. सी. कमांडिंग आॅफिसर कर्नल एफ. एफ. अंकलेसरय्या, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. पी. पारगावकर, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष एस. आर. चरापले यांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी. बी. पाटील, तर प्राचार्य ए. एस. रामाणे यांनी स्वागत व एस. एस. मोरे यांनी सूत्रसंचलन केले.