कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कोल्हापूर महानगरतर्फे मतदार जनजागृतीसाठी ‘नेशन फर्स्ट, व्होटिंग मस्ट’ अभियान राबविण्यात येणार आहे. १0 दिवसांच्या अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील १६४ महाविद्यालयांतील तरुणाईमध्ये जनजागृती केली जाईल; त्यासाठी प्रबोधनरथ, पत्रके आणि पथनाट्याचा आधार घेतला जाणार आहे, अशी माहिती ‘अभाविप’च्या प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.वैराळे म्हणाल्या, सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविण्याबाबत जनजागृती करण्यासाठीची लोकशाही सशक्तीकरणासाठीची जबाबदारी लक्षात घेऊन ‘अभाविप’ने हे अभियान आयोजित केले आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी गारगोटी येथील महाविद्यालयातून होईल.
निवडणुकीत मतदारसंघामध्ये लढणाऱ्या उमेदवारातून एकजण विजयी होतो. ‘नोटा’मुळे कदाचित त्यातील एखादा चांगला उमेदवार या प्रक्रियेमध्ये डावलला जाऊ शकतो; त्यामुळे उपलब्ध उमेदवारांपैकीच योग्य उमेदवाराला मतदान करण्यासाठी म्हणजे १00 टक्के मतदान व्हावे; यासाठी अभियानाद्वारे आवाहन केले जाणार आहे.
त्यासाठी शहर आणि तालुका पातळीवर ५० कार्यकर्ते या अभियानात कार्यरत असतील. अभियानाचा समारोप दि. १० एप्रिलला होईल. पत्रकार परिषदेस अनिकेत वठारे, ऋषिकेश माळी, ऋतुजा माळी, श्रीनिवास सूर्यवंशी, मिहिर महाजन उपस्थित होते.