करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही जगद्जननी आदिशक्ती आहे. मात्र, अज्ञानातून पसरलेल्या गैरसमजुतीतून ही देवी म्हणजेच तिरूपती बालाजीची पत्नी, अशी चुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळे या देवतेचा, करवीर माहात्म्याचा मूळ इतिहास बदलला जात असून, ही महाराष्ट्रीय पद्धतीच्या धार्मिक परपरांसाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीचे मूळ स्वरूप, देवीच्या उपासना पद्धती यांची माहिती देतानाच मंदिराचा इतिहास उलगडून सांगणारी वृत्तमालिका आजपासून... इंदुमती गणेश / कोल्हापूर‘लक्ष्मीनां महा...’ हे शक्तितत्त्व पृथ्वीवर सर्र्वांत आधी जेथे प्रकटले ते स्थान म्हणजे कोल्हापूर. पौराणिक ग्रंथांनुसार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे स्वरूप हे आदिशक्तीचे मूळपीठ असल्याने देवीची मूर्तीचे वर्णन अन्य कोणत्याही स्त्रीदेवतेच्या वर्णनाशी जुळत नाही. ही त्रिगुणात्मक देवता कोणत्याही पुरुषदेवतेची पत्नी नाही. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीची सध्या अस्तित्वात असलेली मूर्ती ही १७१५ साली स्वप्नदृष्टान्ताने बसविण्यात आली. याआधी तेथे असणारी मूर्ती कशी होती, याचे वर्णन मंदिर परिसरातील शिलालेख, आरत्या, सप्तशतीतील ‘राधानिरहस्य’ या ग्रंथात पाहायला मिळते. मूर्तीच्या मस्तकावर नाग, लिंग, योनी ही काल, पुरुष आणि प्रकृती (म्हणजे शिवशक्ती) या तीन तत्त्वांची प्रतीके आहेत. एका हातात बीजफल म्हाळुंगफल, दुसऱ्या हातात पानपात्र, अन्य दोन हातांत गदा, ढाल ही आयुधे आहेत. तिच्यापासून ब्रह्मा, विष्णू, महेश निर्माण झाल्याने डोक्यावर शिव, हृदयात नारायण व चरणांत ब्रह्मस्वरूप अशी त्रिगुणात्मिका आहे. ही देवी शाक्त संप्रदायाची आद्यशक्ती आहे; म्हणूनच ती सिंहवाहिनी आहे. बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज याचा आश्रित हेमाद्री याने लिहिलेल्या ‘चतुर्वर्गचिंतामणी’ या ग्रंथात आद्यशक्तीच्या या वर्णनाची मूर्ती फक्त करवीरातच घडविली जावी, असा नियम घालून दिल्याचा उल्लेख आहे. ही देवी राष्ट्रकूट, शालिवाहन, देवगिरीचे यादव, चालुक्य या साऱ्या मराठा सम्राटांचे कुलदैवत आहे. तिला युद्धदेवतासुद्धा मानले जाते. मंदिरातील सरस्वतीची मूर्ती ही वास्तविक महिषासुरमर्दिनीची असल्याचे बोलले जाते; तर काली हे दुर्गेचेच रूप आहे. त्यामुळे या तीनही देवता अंबेचेच स्वरूप आहेत. उपासकांनी आपल्या उपास्यदेवता या मूर्तीत पाहिल्याने या देवीची जैनांमध्ये पद्मावती, शैव संप्रदायामध्ये शिवपत्नी पार्वती, लक्ष्मी या रूपांत उपासना होत गेली. त्या-त्या कालखंडात समाजावर प्रभुत्व असलेल्या राज्यकर्त्यांचा प्रभाव देवीच्या उपासनेवर पडला. दक्षिणेत मातृ-शक्ती देवतेची उपासना करणारा वर्ग म्हणजे कौलसंप्रदाय. मंदिराच्या उपासना पद्धतीत याच्या पाऊलखुणा आढळतात. संदर्भ असाही..ग. वा. तगारे यांच्या शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ‘संस्कृत करवीर माहात्म्य’ ग्रंथातील ‘महालक्ष्मी कौलाष्टक’ या स्तोत्रात ही देवी कौल संप्रदायाची प्रमुख देवता असल्याचे म्हटले आहे. करवीर माहात्म्य, दुर्गासप्तशती, भारतीय चरित्रकोश मंडळाने प्रसिद्ध केलेले महामहोपाध्याय विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचे देवीमाहात्म्य या सर्व ग्रंथांत महालक्ष्मीच्या सत्त्व, रज, तम या गुणांतून लक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली या तीन देवता प्रकट झाल्या. त्यांची पुढे ब्रह्मदेव-सरस्वती, लक्ष्मी-विष्णू, शंकर-गौरी अशी तीन मिथुने निर्माण झाली व देवीने या तिघांवर विश्वाची जबाबदारी सोपविली, असे वर्णन आहे. कोल्हापुरातील धार्मिक ग्रंथ अभ्यासक वेदमूर्ती सुहास जोशी यांनी अनुवादित केलेल्या ‘करवीर निवासिनी माहात्म्य’ या पुस्तकात देवीचे हे मूळ स्वरूप मांडले आहे.
महालक्ष्मीचे मूळ स्वरूप आदिमायेचे
By admin | Published: September 14, 2014 12:31 AM