कोल्हापूर : अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांना रोखण्यास गेलेले मंडल अधिकारी, तलाठी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज, सोमवारी कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने कामकाजावर बहिष्कार टाकला. कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कामकाज आज दिवसभर ठप्प झाले.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इंगळी (ता. हातकणंगले) येथे अवैधरीत्या वाळू उपसा करून ट्रकमधून ती घेऊन जात असताना इंगळी-रुईचे मंडल अधिकारी सतीश शिंदे, पट्टणकोडोलीचे तलाठी गजानन माळी यांनी ट्रक जप्त केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या इंगळी येथील एका जमावाने शिंदे व माळी यांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. हातकणंगले तहसीलदार दीपक शिंदे यांनी पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्याप मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांवर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांची ही नाराजी अधिकच वाढली.आज, सोमवारी या घटनेचा निषेध आणि संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, म्हणून महसूल कर्मचारी संघटनेने कामकाजावर बहिष्कार टाकून ‘लेखणी बंद’ ठेवली. आज सकाळी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले,परंतु आत गेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कर्मचाऱ्यांची द्वारसभा झाली. त्यामध्ये घडलेल्या घटनेची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष सुनील देसाई, व्ही. एस. कुरणे, आर. आर. पाटील, प्रसाद वडणेरकर, अजय लुगडे, विनायक लुगडे, नारायण पाटील यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांची भेट घेऊन मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावेळी पवार यांनी पोलीस अधीक्षकांशी बोलून कारवाई करायला सांगतो, असे सांगितले. आजच्या ‘लेखणी बंद’ आंदोलनात वाहनचालक, शिपाई, लिपिक, अव्वल लिपिक, तलाठी, नायब तहसीलदार असे ६१३ कर्मचारी तसेच कोतवाल सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कामकाज बंद पडले. कामकाजाच्या निमित्ताने येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र गैरसोय झाली. नागरिकांना कार्यालयात येऊन परत माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी)
महसूलचा कामावर बहिष्कार
By admin | Published: January 06, 2015 12:40 AM