सातारा : ‘तासगावच्या पोलीस ठाण्यातील कोठडीतून पळून गेलेल्या कुमार बद्दू पवार (वय २३) याला शुक्रवारी पहाटे साताऱ्यात पकडल्याची घटना ताजी असतानाच त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे,’ अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजेंद्र प्रेमनाथ जाधव (२३), राहुल लक्ष्मण माने (१९, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जबरी चोरीच्या गुन्ह्यात हे तिघेजण तासगाव पोलिसांच्या ताब्यात होते. पोलीस ठाण्यातील कोठडीच्या छताची फळी काढून या तिघांनी पलायन केले होते. यापैकी कुमार पवार याला शुक्रवारी पहाटे साताऱ्यात पकडले होते, तर राजेंद्र आणि राहुलचा शोध सुरू होता. दरम्यान, हे दोघे शिरवळ (ता. खंडाळा) येथील बसस्थानकासमोरून खासगी वाहनाने साताऱ्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी साताऱ्यात सापळा लावला. शनिवारी पहाटे सहा वाजता हे दोघे साताऱ्यात पोहोचल्यानंतर दोघांनाही तत्काळ पोलिसांनी पकडले. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, हवालदार विलास नागे, हवालदार बाळासाहेब वायदंडे, मोहन नाचण, आनंदराव भोईटे, संतोष जाधव, प्रवीण कडव, योगेश पोळ यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी) तीनशे रुपयांत सहा दिवस राहुल आणि राजेंद्र कोठडीतून पळून गेल्यानंतर त्यांच्याजवळ केवळ तीनशे रुपये होते. या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, तर कुमार पवार हा एकटाच त्यांना सोडून निघून गेला. ३१ मे पासून हे दोघे पुणे, शिरवळ, सातारा या परिसरात भटकत राहिले. त्यावेळी त्यांच्याजवळ केवळ तीनशे रुपये होते. घरी फोन करावा तर पोलिसांना माहिती मिळेल, या शंकेने ते कोणालाही फोन करीत नव्हते. कधी वडापाव, तर कधी भेळ, पाणीपुरी खाऊन या दोघांनी तब्बल सहा दिवस काढले. त्यामध्ये २४० रुपये खर्च झाले. त्यामुळे केवळ ४० रुपये उरले होते. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. एखाद्या हॉटेलमध्ये काम करून पोलिसांपासून दूर राहण्याचाही त्यांच्या डोक्यात विचार होता. त्यासाठी ते साताऱ्यात येत होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांच्या हातात बेड्या पडल्याने त्यांचा बेत फसला.
कोठडी फोडणारे अन्य दोघेही गजाआड
By admin | Published: June 07, 2015 12:27 AM