कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत वनविभागाने मंत्रालयात गुरुवार (दि. २६)पर्यंत बैठक बोलवावी, अन्यथा शुक्रवार (दि.२७) पासून अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा सोमवारी श्रमिक मुक्ती दलातर्फे ताराबाई पार्क येथील वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्यात, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी आंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूआहे. आंदोलनस्थळापासून सकाळी मोर्चा सुरु झाला. जिल्हा परिषद, वारणाभवन, आटीओ, सार्वजनिक बांधकाम कार्यालयामार्गे हा मोर्चा ताराबाई पार्क येथील वन विभागावर नेण्यात आला. या ठिकाणी कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रसाद यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. यावेळी जमिनीच्या निर्वणीकरणाचा प्रस्ताव फक्त मंजुरीसाठी व वारणेच्या लाभक्षेत्रातील जमिनी संपादनासाठी लागणारे पैसे व नागरी सुविधांसाठी लागणारे पैसे, बुडीत झालेल्या गावांच्या ताळीचे व घरांचे, जमिनींचे पैसे मिळण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी तातडीने मंत्रालयात जाऊन स्वत: गुरुवार (दि. २६)पर्यंत बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शुक्रवारी (दि. २७) चांदोली अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व शिराळा तालुक्यातील खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत न सोडण्याचा इशारा दिला.यावर साईप्रसाद यांनी वनविभागाच्या सचिवांशी संपर्क साधून आंदोलकांच्या मागणीनुसार बैठक घेण्यासंदर्भात कळविले, परंतु तारीख अथवा वेळ आंदोलकांना समजू शकली नाही. त्यामुळे बैठकीसंदर्भात इथे येऊन दररोज विचारणा केली जाईल, असे आंदोलकांनी सांगितले.साईप्रसाद म्हणाले, लाभक्षेत्रातील जमिनी संपादन, नागरी सुविधा यासाठी ३४ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी चार कोटी ७६ लाख रुपये जमीन संपादनासाठी लवकरच वर्ग करण्याचा प्रयत्न करू. आज, मंगळवारी पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन वारणा लाभक्षेत्रातील भूसंपादनासाठी, मुलकी पड व गायरान जमिनीसाठी किती निधी लागतो, त्याचबरोबर बुडीत गावे तनाळी, निवळे, ढाकाळे, चांदेल, कुल्याची वाडी व गोठणे यांच्या नागरी सुविधांसाठी किती निधी लागेल, यावर चर्चा होईल.आंदोलनात जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील यांच्यासह अभयारण्यग्रस्त सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) +आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलनव्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्यात, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी आंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, आदी मागण्यांसाठी आंदोलनअभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत जाऊ न देण्याचा इशारापाटबंधारे विभागाची आज, मंगळवारी बैठक घेऊन अभयारण्यग्रस्तांसाठी वारणा लाभक्षेत्रातील जमीन संपादन करण्यासाठी, मुलकी पड व गायरान जमिनीसाठी किती निधी लागतो, बुडीत गावे तनाळी, निवळे, ढाकाळे, चांदेल, कुल्याची वाडी व गोठणे यांच्या नागरी सुविधांसाठी किती निधी लागेल, यावर चर्चा होणार आहे.
...अन्यथा चांदोलीचे फाटक अडवू
By admin | Published: March 23, 2015 11:50 PM