कोल्हापूर : उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे पगार त्यांच्या बँकखात्यावर जमा करावेत, या मागणीसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्यावतीने आज, सोमवारी दुपारी तीन वाजता धरणे आंदोलन केले जाणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ‘आधी खात्यावर पगार, मगच परीक्षा’ हे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर या मंडळाच्या विभागीय अध्यक्षांना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. पगार मिळेपर्यंत बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल. घोषित व अनुदानपात्र प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची तपासणी मंत्रालयातील समितीने दि. १२ ते १५ जानेवारीदरम्यान केली आहे. तपासणी झालेल्या संबंधित शाळांना निधी वितरित होईपर्यंत या समितीने केलेल्या कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळात येऊन केलेल्या कार्यवाही कालावधीतील मंडळाच्या इमारत, सभागृह आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवावे, अशी मागणी या शाळा कृती समितीने पत्रकाद्वारे केली आहे.