कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील नवीन पुलाचे काम आठ दिवसांत सुरू न केल्यास धोकादायक शिवाजी पूल दोन्ही बाजंूनी बंद करू, असा इशारा देत सर्वपक्षीय कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता ए. ए. आवटी यांना चांगलेच धारेवर धरले. अंगावर गुन्हे घेऊ; पण विकासाच्या आडवे येणारे सर्व अडथळे उद्ध्वस्त केले जातील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.नवीन पुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत शुक्रवारी आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपअभियंता आवटी यांची भेट घेऊन चर्चा केली. झाडे तोडण्याबाबत पुरातत्त्व खात्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी १५ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महेश शर्मा यांच्यासमवेत बैठक बोलावली आहे. यामध्ये मान्यता मिळेल, असे उपअभियंता आवटी यांनी सांगितले. यावर हरकत घेत बाबा इंदुलकर म्हणाले, पुलाचा आराखडा तयार करताना हे अडथळे कळले नाहीत का? प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी चुका करायच्या आणि आम्ही मदतीसाठी भीक मागायची, हे चालणार नाही. प्रकल्पाची किंमत वाढविण्याचे हे षड्यंत्र असून पुलाचा आराखडा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करीत भाजपचे महेश जाधव म्हणाले, झाडे व हौद काढण्याबाबत कोणाचीच हरकत नसताना वेळकाढूपणाची भूमिका घेऊ नका, अन्यथा आम्हीच हौद आणि झाडे उद्ध्वस्त करू. स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करून पाण्याचा हौद इतर ठिकाणी हलवावा. सर्व अडथळे दूर करण्याकामी कृती समिती तुमच्यासोबत आहे. तरीही तुम्ही काम सुरूच करणार नसाल तर जुना पूल दोन्ही बाजूंनी बंद करण्याचा इशारा आर. के. पोवार यांनी दिला. जकात नाका हलविण्यास लेखी परवानगी दिली असताना तो तुम्ही का हलवीत नाही? अशी विचारणा करीत आताच नाका हलवा, अन्यथा आम्ही तुम्हाला बाहेर सोडणार नसल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले. अखेर आवटी यांनी कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी फोनवरून बोलून आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता जकात नाका हलविला जाईल, असे लेखी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालय सोडले. यावेळी बाबा पार्टे, संदीप देसाई, अशोक भंडारे, सतीशचंद्र कांबळे, लाला गायकवाड, एस. के. माळी, किसन कल्याणकर, सुभाष जाधव, जहिदा मुजावर, दिलीप पवार, हिदायत मणेर, वैशाली महाडिक, संभाजी जगदाळे, आदी उपस्थित होते.परवानगीमागील गौडबंगाल काय?झाडे व जकात नाका काढण्याची परवानगी दिल्याचे आयुक्त सांगतात आणि तुम्ही येथे कोणतीच परवानगी नसल्याचे सांगता; परवानगीमागील गौडबंगाल काय? अशी विचारणा करीत दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याची मागणी केली.
अन्यथा शिवाजी पूल बंद करू
By admin | Published: March 12, 2016 12:30 AM