कोल्हापूर : कोल्हापूरला लाभलेली चित्रपट परंपरा, मराठमोळी संस्कृती आणि निसर्गाचे वरदान यांमुळे येथे आजही निर्माते चित्रीकरणाला प्राधान्य देतात. मात्र मंगळवारी (दि. ७) झालेल्या खंडणी प्रकरणाने या नावलौकिकाला बाधा पोहोचली असून, कोल्हापूरची बदनामीच झाली आहे. आधीच येथील चित्रपट व्यवसायालाचा अडचणींचा सामना करावा लागत असताना अशा घटना घडल्या तर भविष्यात निर्माते कोल्हापुरात चित्रीकरणच करणार नाहीत, अशी भीती चित्रपट व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.कोल्हापूर म्हणजे चित्रपटसृष्टीची गंगोत्री. या शहराने केवळ मराठीच नव्हे तर देशभरातील चित्रपट रसिकांना दर्जेदार चित्रपट आणि गुणी कलाकार दिले. येथील मुशीत तयार झालेले लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक यांनी आपला काळ गाजविला. गेल्या वीस वर्षांत कोल्हापूरऐवजी मुंबई आणि पुणे हे चित्रपट, मालिकांचे केंद्र झाले. अशा परिस्थितीतही आजही तरुण पिढी या क्षेत्रात आपली चमक दाखवीत आहे. दुसरीकडे, सुसज्ज चित्रनगरीच्या माध्यमातून कोल्हापुरातील चित्रपट व्यवसायाला पुन्हा उभारी येईल, अशी अपेक्षा आहे.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी योग्य लोकेशन मिळत असल्याने गावांमध्ये अनेक चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होत असते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायतीकडे परवानगी घेतली जाते. ही प्रक्रिया झाली की कोणत्याही व्यक्तीकडून चित्रीकरणात अडथळा आणला जात नाही.
असे असताना खंडणीसाठी केर्ली येथे मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटची झालेली मोडतोड कोल्हापूरच्या लौकिकाला बाधक ठरली आहे. हा प्रकार पहिल्यांदाच झाला असला तरी कोल्हापूरबद्दल मुंबईतील निर्मात्यांचे मत कलुषित झाले असून, त्याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे विचारणाही करण्यात आली आहे. महामंडळ यावर काय भूमिका घेणार, हेही आता महत्त्वाचे ठरणार आहे. आधीच कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिक, तंत्रज्ञ अडचणीत असताना अशा घटनांमुळे निर्माते चित्रीकरणासाठी कोल्हापुरात येणारच नाहीत; त्यामुळे व्यावसायिकांच्या रोजगारावर टाच येणार आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.कोल्हापूरची चित्रपट परंपरा लयाला जात आहे. अशावेळी निर्माते विश्वास ठेवून कोल्हापुरात चित्रीकरण करीत असताना असे प्रकार घडले तर चित्रपट व्यावसायिकांना मिळत असलेले कामही बंद होईल. परिणामी त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. निर्मात्यांच्या दृष्टीने पैशांपेक्षाही शांततेने चित्रीकरण, कलाकार आणि सेटची सुरक्षितता महत्त्वाची असते. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. व्यावसायिकांनीही आपल्यातील अहंभाव कमी केला पाहिजे.- यशवंत भालकर (ज्येष्ठ दिग्दर्शक)चित्रीकरणासाठीची अनुमती घेणे, त्याची रीतसर पावती करणे या सगळ्या प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या पातळीवर होत असतात; पण ग्रामपंचायतीतील जबाबदार माणसांच्या गटाकडून खंडणीसाठी चित्रीकरणाच्या सेटची मोडतोड करणे हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.- मिलिंद अष्टेक र(चित्रपट व्यावसायिक)कोल्हापुरात आजवर अनेक चित्रीकरणे झाली आहेत; पण कधीच कोणत्याच गावामध्ये त्यात जाणीवपूर्वक अडथळा आणला गेला नाही. या घटनेनंतर मुंबईतील निर्मात्यांचे कोल्हापूरबद्दलचे मत नकारात्मक झाले असून, त्याबाबत महामंडळाकडे विचारणाही करण्यात आली आहे. जो काही विषय असेल तो ग्रामपंचायतीच्या पातळीवरील आहे. अशा प्रकारे धुडगूस घालणे अत्यंत चुकीचे आहे. - बाळा जाधव(कार्यवाह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)