उद्धव गोडसे
कोल्हापूर : घरबांधणीसाठी घेतलेल्या २५ लाख रुपयांच्या कर्जापोटी तब्बल ८५ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील खासगी सावकाराकडून सुरू आहे. कर्जाच्या वसुलीसाठी घरात गुंड पाठवून धमकावले जात आहे. तसेच कर्जाची परतफेड केली नाही तर घरातील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडू, अशी धमकीही या सावकाराने दिल्याचे पीडित महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या धक्कादायक प्रकाराने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल झाली नाही.शहरालगत असलेल्या वडणगे (ता. करवीर) येथील एका कुटुंबाने नवीन घर बांधणीसाठी खासगी सावकाराकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता व्याजासहित ८५ लाख रुपयांची परतफेड करावी, असा तगादा खासगी सावकाराकडून सुरू आहे. खासगी सावकाराने संबंधित कर्जदाराची कार बळजबरीने ओढून नेली आहे. तसेच घरही बळकावण्याची धमकी दिली आहे.
वेळेत कर्जाची परतफेड न केल्यास घरातील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडू, असे धमकावल्याचे पीडित महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे तक्रार देणार असल्याचेही सांगितले.