रुकडी माणगाव, जि. कोल्हापूर : महापुराने शेतकऱ्यांची वाताहत झाली असून, हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का?, सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा जलसमाधी घेणारच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. रुकडी येथे ‘आक्रोश शेतकऱ्यांचा परिक्रमा पंचगंगेचा’ या पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते.
पूरग्रस्तांना विविध मागण्यांसाठी निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेस शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पदत्रात्रेमुळे पूरग्रस्तांच्या मदतीच्या आशा पल्लवित झाल्याचे पाहायला मिळाले. पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी गावागावातील शेतकरी सहभागी झाले होते. यामुळे मोठी गर्दी झाली होती.
रुकडी येथे अंबाबाई मंदिरामध्ये पदयात्रा आली असता तेथे सभेत रूपातंर झाले. शेट्टी म्हणाले, पंचगंगेचा पूर ओसरून सव्वामहिना झाला; पण अद्यापही मदत मिळेना; मग तत्काळ मदत म्हणायची कशाला? केंद्र सरकारने आपत्कालीन मदतीसाठी निधी आयोगाची स्थापना केली. केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करीत असताना आपत्कालीन निधी या आयोगाकडे वर्ग करीत असते. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीमधून महाराष्ट्राला मदत अद्यापही दिलेली नाही. मग महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.