कागल : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्याबद्दल हालचाली करीत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पाच वर्षे तयारी केलेली असते. गट व कार्यकर्ते सांभाळावे लागतात. ते पाच वर्षे का वाया घालवतील. त्यामुळे त्यांची भूमिका चुकीची नाही. पण अशा बंडखोरांना अपक्ष म्हणून पक्षांनी दाणे घालू नयेत, अन्यथा महायुतीचा पराभव व्हायला वेळ लागणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला आहे. आपल्या मतदारसंघात भाजपचे समरजित घाटगे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केलीच आहे. तशी त्यांची तयारीही सुरू आहे. असाच विषय अनेक मतदार संघात आहे. महायुती एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असतात. माझ्या मतदारसंघात गेल्या लोकसभेला आमचा उमेदवार ७० हजार मतांनी पिछाडीवर होता. तरी मी २८ हजार मताने विजयी झालो. यावेळी तर आम्ही मतांची आघाडी घेतली आहे. राज्यात बहुरंगी लढती होतील असे चित्र दिसते. पण सत्तेवर महायुतीच येणार आहे.
'त्याबद्दल' मी कोणतेही वक्तव्य केले नाहीनवोदिता घाटगे यांची आर्थिक फसवणूक झाली. त्याबद्दल मी कोणतेही वक्तव्य केले नाही. मला याचे राजकारणही करायचे नाही. एका महिलेची फसवणूक झाली आहे. म्हणून आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षा त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करीत असतील.