कोल्हापूर : शहरात फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई तातडीने थांबवावी; अन्यथा महापालिकेवर हातगाड्यांसह घेराव घालू, असा इशारा सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने दिला. शहरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे.
या संदर्भातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी महाराणा प्रताप चौकातील माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी दोन दिवसांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेण्याचा निर्णय झाला. दरम्यान, शहरातील एकही फेरीवाल्यावर कारवाई करता कामा नये, अशीही भूमिका घेण्यात आली. तसा निरोपही त्यांनी आयुक्तांना फोनवरून दिला.यावेळी कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, फेरवाल्यांसंदर्भात महापालिकेचा नियोजनशून्य कारभार आहे. फेरीवाल्यांचा विचार न करताच जागाबदल केला जात आहे. राजारामपुरीतील फेरीवाल्यांचे परीख पूल येथे स्थलांतर करण्यात येत आहे. फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण झाले आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कारवाई करता कामा नये.दिलीप पोवार म्हणाले, प्रशासनाचे कोणतेच नियोजन नाही. फेरीवाला कृती समिती असताना परस्पर चर्चा न करता कारवाई केली जात आहे. फेरीवाला कायद्याची पायमल्ली सुरू आहे. सर्व्हेक्षण झाले असताना अंमलबजावणीसाठी प्रशासनाला अवधी नाही. एकाची गाडी काढली म्हणून कोणाच्या तरी सांगण्यावरून स्टँडवरील सर्व गाड्या काढणे योग्य नाही.रघुनाथ कांबळे म्हणाले, शहराची लोकसंख्या साडेसहा लाख आहे. त्या मानाने नियमानुसार किमान १३ हजार फेरीवाले पाहिजेत. मात्र, महापालिकेकडे केवळ ४१०० फेरीवाल्यांची नोंद आहे. सर्व्हे करणाऱ्या कंपनीने घाईगडबडीने काम केले आहे. सात हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे बाकी आहे. इचलकरंजीमध्ये फेरीवाल्यांचा शोध घेऊन सर्व्हे केला जात आहे. येथे आहे त्या फेरीवाल्यांचा सर्व्हे केला नाही. राजारामपुरी आणि स्टँडवर कोणीतरी एकाने सांगितले म्हणून कारवाई केली. हे चुकीचे आहे. येथून पुढे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. पुनर्वसन केल्याशिवाय एकाही फेरीवाल्यावर कारवाई करता कामा नये.महापालिकेमाजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, शहरातील कोणत्याही फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापूर्वी कृती समितीला विश्वासात घेतले पाहिजे. महापालिकेचा मनमानी कारभार असाच सुरू राहिला तर महापालिकेवर हातगाड्यांसह घेराव घालावा लागेल. चार वर्षांपासून फेरीवाल्यांची फी महापालिकेला जमा झालेली नाही. यामध्ये महापालिकेचेच नुकसान आहे. यावेळी माजी नगरसेवक अशोक भंडारे, अनिल कदम, किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
मरगळ झटकाकृती समितीच्या बैठकीत फेरीवाल्यांचे नेते माजी महापौर वळंजू आणि सुरेश जरग यांनी घरचा आहेर दिला. जरग म्हणाले, फेरीवाल्यांचीही काही चुका आहेत. सर्वेक्षणात १२०० फेरीवाल्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. परिणामी बायोमेट्रिक मिळालेली नाहीत; तर वळंजू यांनी, कृती समितीची प्रशासनासोबत वर्षभरात एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाला फावत आहे. फेरीवाल्यांना कोणी वाली नसल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे सर्वांनी आता मरगळ झटकली पाहिजे. महापालिकेला कारवाई करताना विचार करावा लागेल, असे आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.