कोल्हापूर : कोल्हापूरचीफुटबॉलची परंपरा खंडित करणे, तुमच्या आनंदावर विरजण घालणे हा आमचा हेतू नाही. जनतेची सुरक्षितता हा आमचा उद्देश आहे. स्टेडियमवर येणाऱ्या प्रत्येकाने हे आपले घर आहे, ही भूमिका घेऊनच प्रवेश करावा. आपले घर सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तुम्ही हे घर व्यवस्थित सांभाळू शकला नाहीत तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी गुरुवारी दिला.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन व पोलीस प्रशासन यांच्यावतीने यंदाचा फुटबॉल हंगाम सुरळीत व शिस्तबद्धतेने पार पाडण्यासाठी गुरुवारी सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावर्षीच्या फुटबॉल हंगामास १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. अध्यक्षस्थानी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या बैठकीत बोलताना काकडे म्हणाले, स्वत:चे नेतृत्वगुण विकसित करून फक्त एकमेकांसमोर क्षमता सिद्ध करण्यासाठी खेळाडूंनी खेळले पाहिजे. प्रत्येक खेळाडूची ‘माझे कोल्हापूर’ ही भूमिका असली पाहिजे. आपल्या शहराची नाचक्की होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्या.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूरच्या फुटबॉलचे राज्यासह संपूर्ण देशात कौतुक केले जाते. मात्र, काही अनपेक्षित घटना घडतात आणि या परंपरेला गालबोट लागते. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवल्यास ही परंपरा आणखी उज्ज्वल होऊ शकते.
याप्रसंगी निवासराव साळोखे, विक्रम जरग, लाला गायकवाड, रमेश मोरे यांनी मनोगत व्यक्त केली. बैठकीस शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक व ‘केएसए’चे व्हाईस प्रेसिडेंट अरुण नरके, बाळ घाडगे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, ‘केएसए’चे आॅनररीजनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी स्वागत केले; तर ‘केएसए’चे आॅनररी फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व फुटबॉल संघाचे मुख्य प्रतिनिधी, पंच व खेळाडू उपस्थित होते.
पोलिसांना मैदानावर येऊ देऊ नका...खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवून पोलिसांना मैदानात येऊ देऊ नये, याची खबरदारी घ्यावी.वडीलधारी मंडळींनी कोल्हापूरच्या फुटबॉलची परंपरा वाढविण्यासाठी हस्तक्षेप केल्यास आम्ही फुटबॉल खेळ पाहण्याचा आनंद घेण्यासाठी येऊ, असे भावनिक आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी याप्रसंगी केले.
मालोजीराजेंनी केलेल्या प्रमुख सूचना
- संघप्रमुखांनी खेळाडूंच्या चुकीच्या वर्तणुकीला पाठीशी घालू नये.
- ज्येष्ठांनी खेळाडूंना त्यांची चूक दाखवून द्यावी.
- पंचांचा निर्णय अंतिम राहील.
- ‘केएसए’च्या नियमांचे संघांनी पालन करावे.