...
बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृत ध्वज फडकवून भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित उपद्रवी लोकांवर कठोर कारवाई करावी, तसेच येत्या ३१ डिसेंबरपूर्वी संबंधित लाल-पिवळा हटवावा, अन्यथा १ जानेवारी २०२१ रोजी महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने दिला असून, तशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्तांना सादर केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांना मंगळवारी सकाळी सादर करण्यात आले.
प्रारंभी पोलीस आयुक्त म. ए. युवा समितीच्या शिष्टमंडळाला भेटण्यास टाळाटाळ करत होते. तथापि समितीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडताच पोलीस आयुक्तांनी नमते घेत त्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलावले. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी अध्यक्ष शुभम शेळके यांनी अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाची माहिती आणि राष्ट्रध्वजाचे महत्त्व विशद करून, महापालिकेसमोर उपद्रवी लोकांकडून फडकवण्यात आलेला अनधिकृत लाल-पिवळा ध्वज ३१ डिसेंबरपूर्वी हटविण्यात यावा, अन्यथा १ जानेवारी २०२१ रोजी महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांना सांगितले.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सेक्रेटरी श्रीकांत कदम आदींचा समावेश होता.
फोटो:
पोलीस उपायुक्त निलगार यांच्याशी चर्चा करताना युवा समितीचे पदाधिकारी.