आष्टा : महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे. उसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये द्या, अन्यथा आॅक्टोबरमध्ये कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आष्टा (ता. वाळवा) येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याप्रसंगी शेट्टी बोलत होते. सरकारने विचार न केल्यास प्रसंगी मुंबईत धडक देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, संजय बेले, भागवत जाधव, महावीर पाटील, भास्कर कदम, महेश खराडे, जयवंत पाटील, संदीप राजोबा, जयकुमार कोले, आष्टा शहर अध्यक्ष सुरेश आवटी, अरुण कवठेकर, राहुल थोटे, सुदर्शन वाडकर, प्रतीक हालुंडे, अमोल चौगुले, विजय चौगुले, बंडू मंजुगुडे व कार्यकर्ते उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, एक वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून शेतकरी परिषद, मेळावे घेतले, जनजागृती केली. त्यावेळी साडेसहा ते सात लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठी अर्ज घेतले. पूर्वीच्या तुलनेने सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडत आहेत, मात्र याबाबत सरकारला कोणतीही फिकीर नाही, असे दिसून येत आहे. सर्वच पातळीवर आज शेतकरी सरकारच्या अनास्थेचा बळी ठरत आहे. ढगफुटी, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र याकडे सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. निसर्गाशी दोनहात करता-करता घेतलेले जे पीक विक्रीसाठी बाजारात नेले जाते, तेथेही शेतकरी फसवला जात आहे. १९८२ मध्ये, १९८९ मध्ये व २००८ मध्ये कर्जमाफी झाली, त्याचा गाजावाजा केला जातो. मात्र देशातील कॉर्पोरेट कंपनीची २७ हजार कोटीची संशयित बुडित कर्जे आहेत. त्यातील केवळ दहा लोकांची थकित कर्जाची रक्कम ५८ हजार कोटीवर आहे. आम्ही फक्त राज्याचे ३० हजार कोटी कर्जमाफीची मागणी करीत आहोत.शेतकरी व मोठ्या कर्जदारांना वेगळा न्याय का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. मायक्रो फायनान्स कंपन्या गोरगरीब महिलांना ४२ टक्के व्याज दराने कर्ज देऊन पठाणी वसुली करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले. खा. शेट्टी म्हणाले, देशाची गरज पूर्ण होईल एवढे साखर उत्पादन यावर्षी झाले आहे. पुढीलवर्षी हीच परिस्थिती राहणार आहे. एकीकडे गुजरातसारख्या राज्यामध्ये १२.१८ टक्के रिकव्हरीला ४,४०० रुपये प्रतिटन दर मिळत आहे, मग येथे का नाही? सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आज शेतकरी देशोधडीला लागत आहे.शेतकऱ्याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व उसाला दुसरा हप्ता ५०० पेक्षा अधिक मिळाला पाहिजे. ४ मे रोजी कोल्हापूर येथील शेतकरी मेळाव्यास लाखो शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून ताकद दाखवून द्यावी. सरकारच्या उरात धडकी भरवणाऱ्या मोर्चानंतर प्रसंगी मुंबईत धडक देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)सदाभाऊ गैरहजरखा. राजू शेट्टी म्हणाले, येत्या १ मे महाराष्ट्रदिनी ग्रामसभेत सात-बारा कोरा झाला पाहिजे व उसाला दुसरा हप्ता ५०० मिळाला पाहिजे, असा ठराव करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी, मंत्री सदाभाऊ खोत शासकीय कामामुळे येऊ शकले नाहीत, असे सांगितले, मात्र या कार्यक्रमप्रसंगी, ठिकाणी खोत का आले नाहीत, याचीच चर्चा होती.
...अन्यथा धुराडी पेटू देणार नाही
By admin | Published: April 16, 2017 11:32 PM