कोल्हापूर : भारत सरकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकर जमा करावी, अन्यथा शिवाजी विद्यापीठ प्रशासनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) गुरुवारी दिला. त्याबाबतचे निवेदन ‘एआयएसएफ’च्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले.अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही शिक्षणाची जिद्द असल्यामुळेच अनेक विद्यार्थी शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी येतात. त्यांतील बहुतांश विद्यार्थी हे विविध शिष्यवृत्तीधारक आहेत. त्यात भारत सरकारची शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे; परंतु २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षांतील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्याबाबत गेले वर्षभर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत.
संपूर्ण वर्षभरात विद्यार्थी प्रशासनास तीन वेळा निवेदने देण्यात आली. प्रत्येक वेळी काही दिवसांत मिळेल, असे सांगण्यात आले; परंतु वर्ष संपले तरी शिष्यवृत्ती अजूनही मिळालेली नाही. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी, अन्यथा विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा ‘एआयएसएफ’ने निवेदनाद्वारे दिला आहे.या आंदोलनात प्रशांत आंबी, धीरज कठारे, हरीश कांबळे, आरती रेडेकर, जावेद तांबोळी, संदेश माने, योगेश कसबे, स्नेहल माने, नीलेश कसबे, शीतल शेंडगे, आदी सहभागी झाले. दरम्यान, निवेदन देण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.अन्य मागण्या
- भारत सरकारची शिष्यवृत्ती जानेवारीच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यांवर जमा करावी.
- शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.
- इतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकर त्यांच्या खात्यावर जमा करावी.